मूग, उडीद उत्पादकांची पंचाईत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडतर्फे केली जाणारी मूग, उडदाची खरेदी गुरुवार (ता. १४) पासून  बंद होत असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या परंतु मोजमाप न झालेल्या ६ हजार ८१६ शेतकऱ्यांची पंचाईत होणार आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील नाफेडच्या केंद्रावर मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी केलेल्या एकूण १० हजार ८७१ शेतकऱ्यांपैकी सोमवार पर्यंत (ता. ११) ४ हजार ५५ शेतकऱ्यांच्या १७ हजार ४०३ क्विंटल मूग, उडदाची खरेदी करण्यात आली आहे. अजून ६ हजार ८१६ शेतकऱ्यांच्या मूग, उडदाची खरेदी करणे बाकी आहे.

बाजार भावात घसरण झाल्यामुळे आधारभूत किंमत दराने नाफेडमार्फत मूग, उडदाची खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, देगलूर, बिलोली येथे, परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पूर्णा या ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, कळमनुरी या ठिकाणी आॅक्टोबर महिन्यापासून नाफेडची खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती.

सोमवार (ता. ११) पर्यंत नांदेड जिल्ह्यात मुगाची नोंदणी केलेल्या १ हजार ६४८ शेतकऱ्यांपैकी १७५ शेतकऱ्यांचा ३०२ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला आहे. अजून १ हजार ४७३ शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा आहे. परभणीमध्ये नोंदणी केलेल्या ९९४ शेतकऱ्यांपैकी ४७३ शेतकऱ्यांचा १ हजार २८६.१८ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला आहे.

अजून ५२१ शेतकऱ्यांच्या मुगाची खरेदी शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यात नोंदणी केलेल्या १ हजार १५ पैकी ७६२ शेतकऱ्यांचा २ हजार ६४०.९२ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला असून, अद्याप ३५३ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

नांदेड जिल्ह्यात उडदासाठी नोंदणी केलेल्या ५ हजार२७९ शेतकऱ्यांपैकी १ हजार ७३९ शेतकऱ्यांचा ९ हजार २९५.१७ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला असून, अजून ३१ हजार ५४० शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत. परभणी जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ३२९ शेतकऱ्यांपैकी १३४ शेतकऱ्यांचा ४२५.६६ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला असून, अद्याप १९५ शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १ हजार ५०६ शेतकऱ्यांपैकी ७७२ शेतकऱ्यांचा ३ हजार ४५२.३७ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला आहे. अद्याप ७३४ शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत.

खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत; परंतु अनेक शेतकऱ्यांनी केंद्रावरील निकषात बसत नसल्यामुळे मूग, उडदाची खुल्या बाजारात विक्री केली असल्याची शक्यता आहे; परंतु निकषात बसणारा मूग, उडीद असलेल्या शेतकऱ्यांची मात्र गुरुवार (ता. १४) पासून खरेदी बंद झाल्यामुळे पंचाईत होणार आहे. त्यामुळे मूग, उडीद खरेदीसाठी काही काळ मुदत वाढ देण्याची मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com