गारपिटीने सव्वा लाख हेक्टरवर नुकसान

गारपिटीने सव्वा लाख हेक्टरवर नुकसान
गारपिटीने सव्वा लाख हेक्टरवर नुकसान

पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशातील काही भागांत झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसाने राज्यातील तेरा जिल्ह्यांत मिळून सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी (ता. १२) आणि आज (ता.१३) ही पावसाचा अंदाज असल्याने या नुकसान क्षेत्रात वाढ होण्याची भीती आहे. तसेच पावसानंतर चार-पाच दिवसांत पिकाची नुकसानपातळी वाढते. ३३ टक्केंच्या वरील नुकसान भरपाईस पात्र असल्याने, पंचनामे करताना पीक नुकसानीचा पुढील कालावधीही धरावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  दरम्यान, परभणी जिल्ह्यात भगीरथीबाई पांडुरंग कांबळे यांचा चुडावा (ता. पूर्णा) शिवारात सोमवारी (ता. १२) गारपिटीत सापडल्याने मृत्यू झाला व इतर सहाजण जखमी झाले.  प्रभावित प्रमुख जिल्हे विदर्भ : अमरावती, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, वर्धा मराठवाडा : जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली खान्देश : जळगाव नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये) विदर्भ : ६५,३६० मराठवाडा : ४६,४७४ खान्देश : ४५० (रविवारपर्यंत) नुकसानग्रस्त पीक... रब्बी : गहू, हरभरा, मका, ज्वारी, करडई आदी फळबागा : संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी इतर : भाजीपाला, ऊस, टरबूज, खरबूज, भोपळा, चारापिके आदी आजही इशारा भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) वादळीवारा, वीज व प्रामुख्याने गारपीट होण्याची तसेच मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवारा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. राज्य सरकारच्या या अहवालानुसार ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा व अमरावती जिल्ह्याला बसला असून त्यापाठोपाठ जालना जिल्ह्याचा समावेश असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

या बाधित जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन व कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित ११ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यांतील ४२ गावातील १० हजार ६३२ हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यांतील १७५ गावांमधील ३२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील २३ गावातील ३ हजार ५९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. जालना व परभणी जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यांतील ३८ गावांचा समावेश असून २ हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या १० तालुक्यांतील २८६ गावांमधील ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा या आठ तालुक्यांतील २७० गावातील २६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्याती मूर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यांतील १०१ गावांमधील ४ हजार ३६० हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील ३६ गावांमधील ८ हजार ५०९ हेक्टर क्षैत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यांमधील ५९ गावातील २ हजार ६७९ क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. उमरगा व उस्मानाबाद या दोन तालुक्यांतील २६ गावांमधील ५८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औढा या दोन तालुक्यांतील ३० गावांमधील १४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण १०८६ गावातील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com