एक हजार कंटेनर फळे, भाजीपाला अडकला

एक हजार कंटेनर फळे, भाजीपाला अडकला
एक हजार कंटेनर फळे, भाजीपाला अडकला

मुंबई : वाहतूकदारांच्या संपामुळे उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातील आयात-निर्यात गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. याचा सर्वाधिक मोठा फटका भाजीपाला आणि फळे या नाशवंत शेतीमालाला बसला असून संप तातडीने न मिटल्यास सुमारे एक हजार कंटेनर फळे आणि भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे जेएनपीटी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा संप मिटवावा, तसेच केंद्र आणि राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.  जेएनपीटी प्रशासनाने टेंडरद्वारे काही ठराविक वाहतूकदारांना बंदरातून वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्यामुळे पूर्वापार जे हजारो वाहतूकदार या ठिकाणी कार्यरत होते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, या वाहतूकदारांनी सर्वपक्षीय संघटनांना हाताशी धरून बंदरात संप पुकारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जेएनपीटी ठप्प आहे. बंदरात दरदिवशी सुमारे १५ हजार कंटेनर सामानाची आयात-निर्यात होते. येत्या लवकरच रमजानचा महिना सुरू होत असल्याने आखातात भाजीपाला आणि फळांना मोठी मागणी असते.  दररोज सुमारे ४०० ते ५०० कंटेनर भाजीपाला आणि फळे आखातात पाठवला जात आहे. विशेषतः याकाळात हापूस, डाळिंब, पपई आदी फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे निर्यातीद्वारे शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतात. मात्र, संपामुळे सुमारे ५०० कंटेनर फळे, भाजीपाला कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहे. संप लवकर न मिटल्यास सुमारे एक हजार कंटेनर फळे, भाजीपाला बंदरावर अडकून पडणार आहे. याचा मोठा फटका व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनाही बसणार असल्याची भीती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांचे व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, व्यापाऱ्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यापुढे या संदर्भात कैफियत मांडली. त्यानंतर श्री. पवार यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांनी जेएनपीटी प्रशासनालाही तातडीने संप मिटवण्यासाठी कारवाई करण्याची सूचना केली. राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनाही व्यापाऱ्यांनी संप मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com