मराठवाड्यात मोसंबीचा आंबेबहर संकटात

हवामानात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलाचा मोसंबीवर परिणाम होतो आहे. या बदलामुळे फळगळ वाढली आहे. त्यासाठी प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया देण्यासोबतच १०० लिटर पाण्यात एक किलो युरियाची फवारणी पंधरा दिवसांच्या फरकाने दोन वेळा घेतल्यास गळ रोखण्यात मदत होईल. - डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद.
शेतकरी जयाजीराव सूर्यवंशी यांच्या बागेतील मोसंबीची झालेली फळगळ.
शेतकरी जयाजीराव सूर्यवंशी यांच्या बागेतील मोसंबीची झालेली फळगळ.

औरंगाबाद ः  फळपिकांमध्ये ‘राजा पीक’ म्हणून  ओळख असलेल्या मराठवाड्यातील मोसंबीचा आंबेबहर संकटात सापडला आहे. हवामान बदलामुळे फळगळीचे प्रमाण वाढले असून, त्याचा फटका उत्पादनाला बसणार, हे स्पष्ट झाले आहे.  मोसंबीने आपल्या ४४ वर्षाच्या प्रवासात मराठवाड्यातील जवळपास ४५ हजार हेक्‍टरवर आपले बस्तान मांडले आहे. मराठवाड्यातील ‘न्युसेलर’ मोसंबीची चवच न्यारी आहे. आपल्या आंबट - गोड स्वादाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या मोसंबीला ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. आपल्यातील आरोग्यदायी गुणांमुळे या स्पर्धेत इतर राज्यातील मोसंबीच्या वाणांना मागे टाकण्याचे काम मराठवाड्यातील न्युसेलर मोसंबीने केले. परंतु यंदा मोसंबीच्या आंबे बहारावर वातावरणातील बदलाचे संकट कोसळले आहे. आंब्याप्रमाणेच मोसंबीची फ्लावरिंगही एकापेक्षा जास्त टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्यात जानेवारीत झालेली आंबे बहाराची सेटिंग बऱ्यापैकी यशस्वी झाली. परंतु फेब्रुवारीमध्ये सेटिंग झालेल्या मोसंबीची गळ संकटात सापडली आहे. महिनाभरापासून तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात होणाऱ्या चढ उताराने फेब्रुवारीतील मोसंबीच्या सेटिंगवर संकटं घेऊन आले. साधारणत: सेटिंगच्या तुलनेत सरासरी होणारे उत्पादन यंदा होत असलेली बाल्याअवस्थेतील फळांची होणारी गळ पाहता हाती येण्याची आशा धुसरच असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गळीचे प्रमाण २० ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. पाण्याचे, खताचे सुयोग्य व्यवस्थापन नसलेल्या बागांमध्ये गळीचे प्रमाण अधिक असल्याचेही जाणकारांनी सांगितले.  ठिबकवर पाणी दिल्या जाणाऱ्या बागांमध्ये यंदा काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोकळे पाणी दिल्याने झाडांच्या सवयीत झालेला बदलही फळगळीला पोषक ठरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  प्रतिक्रिया एकदम थंडी अन्‌ एकदम उष्णतेने मोसंबीचे जीवनचक्र बिघडले आहे. महिनाभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नियोजन कोलमडून जवळपास ३० ते ३५ टक्‍क्‍यांपर्यंत फळगळ झाली आहे.  - राजेंद्र चोरमले, मोसंबी उत्पादक, घुंगर्डे हातगाव, ता. अंबड, जि. जालना. 

हवामानातील बदलामुळे फळगळ मोठ्या प्रमाणात होते आहे. ३० टक्‍क्‍यांपुढे गेलेली ही फळगळ अजूनही सुरूच आहे.  - विष्णू बोडखे, मोसंबी उत्पादक, मुधळवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com