खासदार खैरेंनी जनतेची खैरच ठेवली नाही ः अजित पवार

खासदार खैरेंनी जनतेची खैरच ठेवली नाही ः अजित पवार
खासदार खैरेंनी जनतेची खैरच ठेवली नाही ः अजित पवार

कन्नड, जि. औरंगाबाद ः ‘‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या औरंगाबादचे येथील सत्तेने गेल्या वीस वर्षांत प्रचंड हाल केले. आमच्या सत्ता काळात अनेक वेळा निधी देऊनही महानगरपालिकेला पाणी किंवा कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. गेल्या अनेक वर्षांत येथे एकही कारखाना आणला नाही. केंद्राची एकही योजना आणली नाही. निवडणुका जवळ आल्या की जाती जातीत कुरापती काढायच्या, भांडणे लावायची, त्यातून एका समाजाची मते मिळवायची, असा प्रकार सुरू असून खासदार खैरेंनी जनतेची खैर ठेवली नाही,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कन्नड येथे केली.

शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी (ता. २१) आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे, किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, विजय बोराडे, माजी आमदार संजय वाघचौरे, प्रसन्ना पाटील, तालुकाध्यक्ष बबन बनसोड, शहराध्यक्ष अहेमद अली, सविता मातेरे, सुदाम राठोड, युवक तालुका अध्यक्ष कल्याण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पवार पुढे म्हणाले की, मोदी सरकारने हजारो कोटी रुपये जाहिरातीत खर्च केले. खोटे बोला पण रेटून बोला, या प्रमाणे सर्व काम सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात माळी, कुणबी व मुस्लिम समाजाचा एकही प्रतिनिधी नाही. मग शेतकऱ्यांचे व सामान्यांचे प्रश्न कसे समजणार, असा सवाल करत सरकारला खाली खेचण्याचे आवाहन केले. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणे झाली.

वा रे शासन तेरा खेल,  न्याय मांगा तो हो गई जेल ः भुजबळ मला अडीच वर्षे जेलमध्ये राहावे लागले. मला का पकडले हे मला अजूनही कळाले नाही. एवढेच काय तर मला पकडणाऱ्यांनाही अजून कळले नाही की, त्यांनी मला का पकडले. आधी सांगितले की दहा हजार कोटींचा घोटाळा आहे. नंतर सांगितले की, आठ हजार कोटींचा गैरव्यवहार आहे. असे करत करत १०० कोटींवर आले. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनाचा बांधण्याचा ठेका मी दिलेलाच नाही. त्यावर कडी म्हणजे ज्या ठेकेदाराने हे महाराष्ट्र सदन बांधले त्याला गेल्या चार वर्षांत आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नाही. म्हणजे पाच फुटांच्या म्हशीला पंधरा फुटांचा रेडकू झाल्याचे ही मंडळी सांगत होते. जेंव्हा पंतप्रधान मोदी, आपल्या मुख्यमंत्र्यांबरोबर महाराष्ट्र सदनात गेले, ते बघून मोदी अवाक झाले. त्यांनी पूर्ण परिसर हिंडून बघितला. आता त्यांचे अनेक बैठका ते तेथेच घेतात. याबरोबर श्री. भुजबळ यांनी राज्य व केंद्र शासनावर आपल्या शैलीत प्रखर टीका केली. अनेक प्रसंगात मोदींच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com