मुगाचे पीक बनले यंदा आतबट्ट्याचे

आमच्या भागात मुगाचे काहींना एकरी ५० किलो, काहींना ८० किलो उत्पादन आले. कारण फुले लागली तेव्हा पाऊस नव्हता. फुलगळ झाली. पावसाचा खंड २३ ते २८ दिवस राहिला. उत्पादन घटले. त्यातच खुल्या बाजारात पाच हजार रुपये प्रतिक्विंटलनेही कुणी मूग खरेदीला तयार नाही. बाजार समिती बंदावस्थेत आहे. ही वेगळीच समस्या आहे. उडदाचेही असेच होईल, असे दिसत आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, आसोदा, जि. जळगाव
मूग
मूग

जळगाव ः खरिपातील इतर पिकांसारखेच मुगाचे पीक यंदा वाढता मजुरी खर्च पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात आलेली घट यामुळे आतबट्ट्याचे ठरले आहे. तापी नदी काठच्या काळ्या कसदार जमिनीत एकरी ८० किलो ते एक क्विंटलही उत्पादन आलेले आहे. त्यातच दराही कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना एकरी दीड हजारापर्यंत फटका बसत आहे. 

जे उत्पादन आले आहे, ते हमीभावाच्या तिढ्याने बाजार समित्या बंद असल्याने विकायचे कोठे, हा प्रश्‍नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात कांदेबाग केळीचे उत्पादन घेणाऱ्या चोपडा, जळगाव, यावल भागातील अनेक शेतकरी बेवड म्हणून मुगाची पेरणी करतात. जिल्ह्यात किमान २१ ते २२ हजार हेक्‍टरवर मुगाची पेरणी केली जाते. एकरी किमान तीन ते साडेतीन क्विंटल मुगाचे उत्पादन घेणारी मंडळी या भागात आहे. यंदा नेमकी पिकाला फुले लगडताच पावसाचा खंड पडला. काही भागात २३ दिवस तर काही गावांमध्ये २७ दिवस पाऊसच नव्हता. फुलगळ झाली. मग नंतर पाऊस आला. त्यात शेंगा जेमतेम भरल्या. त्यांची तोडणी होऊन अनेक ठिकाणी मळणी झाली आहे. मळणी ट्रॅक्‍टरने व्यवस्थित होत नसल्याची स्थिती आहे. कारण पावसामुळे शेंगा अधिकच्या आर्द्रतायुक्त आहेत. काही भागात बारीक दाणे, काळसर दाण्यांच्या तक्रारीदेखील आहेत. 

तापी काठावरील कठोरा (ता. जि. जळगाव) येथील शेतकरी गणेश पाटील यांना पाऊण एकरात ६० किलो मूग मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी कापसात आंतरपीक म्हणून पेरणी केली होती. त्यांना तर शेंगाच हव्या तशा लागल्या नाहीत. ज्यांनी औत भाडेतत्त्वावर घेतले, फवारण्या केल्या, रासायनिक खते दिली, त्यांना अधिकचे नुकसान सहन करावे लागत असून, एकरी किमान एक ते दीड हजारांचा फटका त्यांना बसला आहे. 

आकडे दृष्टीक्षेपात मुगाचा उत्पादन खर्च (एकरी) बियाणे ः ४०० खते - सुमारे १००० फवारणी - सुमारे ५०० पेरणी खर्च - ६०० तणनियंत्रण - १००० आंतरमशागत - ८०० शेंगा तोडणे - १००० मळणी (मजुरांकरवी) - १००० एकूण खर्च - ६ हजार ३००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com