Kharbuj Market Rate : राज्यात खरबूज ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

राज्यात खरबूज ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल
राज्यात खरबूज ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची सुमारे १ हजार क्रेट आवक झाली हाेती. रमझानचे उपवास सुरू झाल्याने खरबुजाला मागणी वाढली असून, प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे आडत्यांनी सांगितले. याबाबत बाेलताना आडते साैरभ कुंजीर म्हणाले, रमझानच्या उपवासांमुळे खरबुजाला मागणी वाढल्याने आवकेत देखील वाढ हाेत आहे.

सध्या दरराेज सुमारे १ ते दीड हजार क्रेट आवक हाेत अाहे. यामध्ये प्रामुख्याने बॉबी आणि कुंदन जातींचा समावेश आहे. कुंदन वाणापेक्षा बॉबी वाण अधिक रसाळ आणि गाेड असल्याने याला दर अधिक मिळत आहे. बाॅबी वाणाला ३० ते ४० तर कुंदनला २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये

अकोला : येथील बाजारपेठेत खरबूज ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात अाहे. दररोज दोन तीन टन खरबुजाची विविध भागांतून अावक होत अाहे. मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अकोला बाजारात खरबूज अावक होत अाहे. अाधी संकरित खरबूज हंगाम जोरात झाला. त्यानंतर अाता गावरान खरबूज अधिक प्रमाणात येत अाहेत. उच्च प्रतीचे खरबूज १५०० रुपयांपर्यंत विकले जात अाहे.

दुय्यम खरबूज अाठशे ते हजार रुपयांपर्यंत विकत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. किरकोळ बाजारात हे खरबूज सर्रास २५ ते ४० रुपये किलोने ग्राहकांना विक्री होत अाहे. अाणखी १५ दिवस हा खरबूज हंगाम चालणार असून, रमजान महिना सुरू झाल्याने या दरात वाढीची शक्यता सूत्रांकडून वर्तविली गेली. नागपूरात प्रति नग १५ रुपये

नागपूर : नागपूरच्या कळमणा बाजारात खरबुजाची घाऊक दराने तीन ते चार रुपये अशी खरेदी होत असताना किरकोळ बाजारात मात्र खरबूज प्रतिनग १५ ते १६ रुपयांप्रमाणे विकले जात आहे. ग्राहकांची खरबुजाच्या तुलनेत कलिंगडाला अधिक मागणी आहे, त्यामुळे खरबुजाचे व्यवहार हातचे राखूनच होत असल्याची स्थिती असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. खरबुजाची आवक नागपूरलगतच्या जिल्ह्यातून होते, असेही सांगण्यात आले.

परंतु ग्राहकांचा प्रतिसाद याला नसल्याने तुलनेत मर्यादित व्यवहार होतात. यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोंदिया जिल्ह्यातूनदेखील काही प्रमाणात खरबूज नागपूर बाजारपेठेत दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. परभणीत खरबूज २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून खरबुजाची आवक होत आहे.दररोज साधारणतः ३० ते ४० क्विंटल आवक होत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून आवक कमी झाल्यामुळे दरात तेजी आली आहे.

गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी सरासरी ३० ते ६० क्विंटल आवक झाली असताना सरासरी १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गुरुवारी (ता. १७) ३५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर किरकोळ विक्री ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी सय्यद नईम यांनी सांगितले.

Kharbuj Market Rate
Kharbuj Market RateAgrowon

सोलापुरात प्रति दहा किलोस २०० ते ३०० रुपये :

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात खरबुजाची मागणी आणि आवक दोन्ही स्थिर राहिल्याने दरही स्थिरच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. समितीच्या आवारात गतसप्ताहात खरबुजाची आवक केवळ एक-दोन गाड्याच राहिली. खरबुजाची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली.

खरबुजाला प्रति दहा किलोला किमान ३० रुपये, सरासरी २०० रुपये आणि सर्वाधिक ३०० रुपये असा दर मिळाला. मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात आवक रोज एखादी गाडीच राहिली. पण दरामध्येही फारसा फरक झाला नाही, खरबुजाला प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहात खरबुजाची आवक पुन्हा रोज दोन गाड्यांपर्यंत राहिली. पण दरात सुधारणा झाली नाही.

खरबुजाला प्रति दहा किलोस १३० ते २०० रुपये असा दर मिळाला. खरबुजाची मागणी आणि आवकेत फारसा चढ-उतार नसला, तरी मागणी तशी स्थिर राहिल्याने दरात सुधारणा झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १००० ते २३०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची १३० क्‍विंटल आवक झाली. या खरबुजाला १००० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीला खरबुजाची २० क्‍विंटल आवक झाली. या खरबुजाला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० एप्रिलला ७२ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

२४ एप्रिलला १२२ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाचा दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २ मेला खरबुजाची आवक १३० क्‍विंटल तर दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ मे ला १७ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. नगरला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये

नगर : नगर बाजार समितीत खरबुजाला साधारण १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मात्र, गेल्या महिनाभराच्या तुलनेत आज गुरुवारी (ता. १७) खरबुजाची आवक कमी झालेली दिसली. नगर जिल्ह्याच्या दक्षिणेसह शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खरबुजाचे क्षेत्र यंदा वाढलेले दिसले. या भागातून नगर बाजार समितीत खरबुजाची आवक होती. गुरुवारी (ता. १७) ४५ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते २५०० रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला.

१० मे रोजी २९ क्विंटलची आवक होऊन ७०० ते १९०० व सरासरी १३०० रुपयांचा तर ३ मे रोजी ११५ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. २६ एप्रिल रोजी १५८ क्विंटलची आवक झाली. त्या दिवशी एक हजार ते २२०० रुपये व सरासरी १६०० रुपयांचा दर मिळाला. १९ एप्रिल रोजी २०४ क्विंटलची आवक झाली. त्या दिवशी १००० ते २००० हजार व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत गेल्या महिनाभराच्या तुलनेत खरबुजाची आवक कमी झाल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com