नवी दिल्ली ः तेलंगणा आणि राजस्थानमध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) खरिपातील उडदाची खरेदी सुरू केली आहे. राजस्थानमधील आठ केंद्रांवर आणि तेलंगणात ही खरेदी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन्ही राज्यांत उडदाची आवक वाढली आहे. मात्र, डालमिलकडून मागणी कमी असल्याने दर हमीभावाच्या खाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यांच्या प्रस्तावांनंतर नाफेडकडून उडदाची किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) प्रतिक्विंटल ५,४०० रुपये (बोनससह) दराने खरेदी सुरू झाली आहे.
नाफेडने शुक्रवारी (ता. ६) पहिल्या दिवशी राजस्थानमधील बारन, अत्रू, खानपूर, इटवा, सांगोड, बुंदी, भवानीमंडी येथील केंद्रावर २१० टन उडदाची खरेदी केली आहे. तर तेलंगणामधील मंडूर आणि तंडूर येथील केंद्रावर ३५ टन उडीद खरेदी केली आहे, अशी माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हमीभावाने खरेदीचा आतापर्यंत २०५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.