नगरमध्ये साथीच्या आजाराचा कहर

नगरमध्ये साथीच्या आजाराचा कहर
नगरमध्ये साथीच्या आजाराचा कहर

नगर ः जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढत आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २३ झाली आहे. यातील पाच मृत्यू जिल्ह्यात, तर १८ मृत्यू परजिल्ह्यांत उपचार सुरू असताना झाले आहेत.

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी व पावसाचा पत्ता नाही, अशा वातावरणाचा अगोदरच मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे. आरोग्य विभागाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ८४५ रुग्णांची तपासणी केली आहे. यामध्ये ४० हजार ४७८ रुग्ण ‘अ’ गटातील, ३०५ ‘ब’ गटातील आहेत. ‘क’ गटामध्ये ६२ रुग्ण असून, त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे तपासणीत आढळले आहे.

यात सर्वाधिक २९ रुग्ण संगमनेर तालुक्‍यात आढळले आहेत. त्या खालोखाल अकोले तालुक्‍यात १३ रुग्ण आहेत. कोपरगाव- सात, राहाता- पाच, नगर, कर्जत, नेवासे, पारनेर, राहुरी, शेवगाव या तालुक्‍यांत प्रत्येकी एक व श्रीगोंदे तालुक्‍यात दोन रुग्ण आढळले आहेत. विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूमुळे दगावलेल्या २३ पैकी सर्वाधिक रुग्ण कोपरगाव तालुक्‍यातील असून, त्यांची संख्या सात आहे. त्या खालोखाल संगमनेर तालुक्‍यातील सहा रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अकोले- पाच, नगर, नेवासे, राहाता, राहुरी, श्रीगोंदे या तालुक्‍यांत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गावोगाव तपासणी ‘स्वाइन फ्लू’ अथवा संशयित आजाराने एखाद्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागाकडून संबंधित गावात तपासणी केली जात आहे. तसेच संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. संबंधित रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करावे. तेथे उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

लक्षणे - - घसा खवखवणे, ताप येणे,  खोकला येणे, घसा दुखणे, श्‍वास घेण्यास त्रास,  अतिसार, उलट्या

हे करा - - हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा. - खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा. - भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या.

हे टाळा - - सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. - डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे. - संसर्गजन्य रुग्णाला भेटणे. - लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा. - ३६ तासांत उपचाराने स्वाइन फ्लू बरा होतो.

घशात खवखव, सर्दी-खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्या. अन्य रुग्णालयात जाऊन वेळ दवडू नका. वेळेत उपचार घेतल्यास स्वाइन फ्लू बरा होतो. - डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com