agriculture news in marathi, Nagesh tekale article on Agriculture | Agrowon

आनंद पिकविणारी करूया शेती
डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 1 जानेवारी 2018

पारंपरिक पिकांचा मेळावा, कौटुंबिक अन्नसुरक्षा, वृक्षशेती, फळांची शेती, ग्रामीण पातळीवरील प्रक्रिया उद्योग, निसर्गाशी मैत्री या बाबी शेतकऱ्यांना आनंद देतात. असा आनंद मी देश-विदेशामधील भटकंतीमध्ये कितीतरी शेतकऱ्यांजवळ अनुभवला आहे. तोच इथे शब्दरुपात मांडत आहोत.

पारंपरिक पिकांचा मेळावा, कौटुंबिक अन्नसुरक्षा, वृक्षशेती, फळांची शेती, ग्रामीण पातळीवरील प्रक्रिया उद्योग, निसर्गाशी मैत्री या बाबी शेतकऱ्यांना आनंद देतात. असा आनंद मी देश-विदेशामधील भटकंतीमध्ये कितीतरी शेतकऱ्यांजवळ अनुभवला आहे. तोच इथे शब्दरुपात मांडत आहोत.

व र्षभर सातत्याने आर्थिक उत्पन्न देणाऱ्या कृषी  व्यवसायास शाश्‍वत शेती असे म्हणतात. चार-पाच दशकांपूर्वी शाश्‍वत शेतीची व्याख्या वेगळी होती. शेतकऱ्यांच्या कुटुंबास वर्षभर खात्रीची अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतीला शाश्‍वत शेती म्हटले जात असे. यामध्ये विविध खरीप, रब्बी उत्पादने, सेंद्रिय पद्धतीने घेण्यावर भर होता. नंतरच्या दशकात ज्या शेतकऱ्यांकडे खात्रीचे पाणी उपलब्ध होते, ते उन्हाळी पिकांबरोबरच ऊस, केळीसारखी पिके घेऊ लागले आणि कृषीमध्ये आर्थिक उलाढाल शाश्‍वत पद्धतीने होऊ लागली. ७० च्या दशकानंतरच्या हरितक्रांतीने पुढील एक तप शेतकऱ्यांना शाश्‍वत शेतीची मधूर फळे दिली. मात्र, त्यानंतर रासायनिक खते, कीडनाशके, तणनाशकांचा वापर वाढला. त्यामुळे शाश्‍वत शब्द पुसट झाला.

आज याच शब्दाला कर्ज, आत्महत्या, नैराश्‍य, उद्‌ध्वस्त, दुष्काळी या उपशब्दांची जोड लागली आहे. या चार-पाच शब्दांशिवाय शेती हा शब्द पूर्ण होत नाही. शाश्‍वत शेतीस ग्रहण लागण्यासाठी ज्या अनेक कारणांचा अभ्यास केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीनसारखी पिके, रासायनिक खते, कीडनाशकांचा अमर्यादित वापर, मृत झालेली मृदा, भूगर्भातील पाण्याचा वाढलेला उपसा, वृक्षतोड, एक पीक पद्धती, सेंद्रिय खताची टंचाई, शेतमजूर समस्या, अल्पभूधारकता, हवामान बदल, नको त्या गोष्टींचे अनुकरण आणि पिकांच्या भौगोलिक स्थानास गौण ठरविणे या कारणांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य, कौटुंबिक अशांतता, व्यवस्थेवर राग, कर्जबाजारीपणा, मानसिक ताणतणाव वाढत आहे. प्रत्येकास हे समजते, पण परिस्थितीपुढे असहाय्य असतात. कोणताही नवा प्रयोग फक्त अंग भाजून काढणाऱ्या ठिणग्यांचेच काम करत असतो. आणि याउलट जेव्हा आपण शाश्‍वत शेतीचा विचार करतो, तेव्हा अंगावर पडणारे आनंदाचे तुषार खूप काही बोलत असतात. 

केरळमधील नारळ उत्पादन घेणारा शेतकरी फळे उत्पादनाबरोबर याच वृक्षापासून निरेचे उत्पादनसुद्धा घेतो. यामध्ये वर्षभर शाश्‍वत अर्थाजन चालू असते. कॉफी उत्पादक फक्त बिया निर्माण करत नाही तर कॉफी पावडर आणि कॉफी पेयसुद्धा पर्यटकांना त्याच्या शेतावर उपलब्ध करून देतो. यामध्ये त्याचे सर्व कुटुंबीय सहभागी असते. सिक्कीममधील शेतकरी मुख्य पिकांबरोबर फूल उत्पादनसुद्धा घेतात. सिक्कीमचे आर्किड जग प्रसिद्ध आहेत. भूतानमधील शेतकरी वर्षभर सहा ते आठ पारंपरिक पिके घेतात आणि विविध प्रकारच्या भाज्या, संत्री, केळी, ‘याक’चे दूध, त्यांचे पदार्थ याची विक्री करत असतात.

अरुणाचल प्रदेश आणि मेघालयामधील सर्व शेती शाश्‍वत आहे. तेथील शेतकरी कृषी उत्पादनामधून आपल्या कुटुंबास अन्नसुरक्षा तर देतात, शिवाय चांगले अर्थार्जनसुद्धा करतात. तेथील एका शेतकऱ्याच्या शेतातस मी मुद्दाम भेट दिली. भाताचे उत्पादन घेतल्यावर त्याच जमिनीत रताळ्याचे पीक घेतले. बांधावर छानसा स्टॉल टाकला होता आणि पर्यटकांना, स्थानिकांनाही शेतामधील रताळी त्यांच्या स्वहस्ते काढून नैसर्गिक विस्तवावर भाजून त्यावर मसाला टाकून आकर्षक डीशमध्ये देत होता. त्या परिसरामधील अनेक शेतकरी असे विविध उपक्रम करत होते. थोडे कष्ट आणि मर्यादित अपेक्षा ठेवल्या की अशा विविध प्रयोगांमधून आपणास वेगळाच आनंद मिळतो. शाश्‍वत शेतीचे अनेक प्रयोग आपणास बाली, फिलिपिन्स, चीनमध्ये पहावयास मिळतात. चीनमध्ये अनेक शेतकरी शेततळ्यामध्ये कमळ शेती करतात.

फुललेल्या कमळ फुलांच्या दर्शनाने एकाग्रता वाढते, नैराश्‍य दूर होते हे संशोधनाने सिद्ध झाल्यावर एका शेतकऱ्याने त्याचा शेततलाव विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुला केला, अर्थात त्यामधून अर्थाजन करूनच. कमळ कंद, कमळ बीज यांचे उत्पादन वेगळेच. फिलिपिन्समध्ये सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादन घेतल्यावर तेथील शेतकरी त्याच जमिनीत विविध फळभाज्या आणि अननसाचे आंतरपीक घेतात. सेंद्रिय उत्पादन असल्यामुळे अनेक पर्यटक शेताच्या बांधावर अननसाचा रस पिण्यासाठी गर्दी करतात. शाश्‍वत शेती ही शेतकऱ्याने स्वतःच त्याच्या शेतामधील उत्पादनास जोडून करावयाची असते. मात्र काही मोजके अपवाद वगळता आपल्याकडे तसे होत नाही.

चिकूच्या बागेमधील फळे विकली जातात आणि व्यावसायिक त्याचे विविध पदार्थ करून पैसा मिळवतो. असेच काहीसे आंबा, फणस, काजू, केळी, कोकम याबाबतीत सुद्धा आढळते. फळबाग ही शाश्‍वत शेती असली तरी जोपर्यंत स्वतः उत्पादक त्यावर प्रक्रिया करत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने शाश्‍वत होत नाही. चार म्हशी आणि गाई सांभाळून त्यांचे दूध डेअरीला घालणारा शाश्‍वत उपक्रम राबवत नसतो. या उलट त्याच दुधापासून दही, ताक, लोणी, शुद्ध तूप, गोमूत्र, गोवऱ्या, शेणखत निर्माण करणारा खरा शाश्‍वत शेती करत असतो. कारण तो फक्त दुधावरच अवलंबून नसून प्रक्रिया केलेल्या पदार्थांतून आर्थिक बळ मिळवित असतो. एकट्यापेक्षा संपूर्ण कुटुंबाने केलेली शाश्‍वत शेती जास्त यशस्वी होते. शेवग्याचा डिंक औषधी असतो आणि त्याचे उत्पादन वर्षभर चालू असते. शेवगा उत्पादकाने शेंगांचा हंगाम घेतल्यानंतर याच झाडाचा डिंक त्यास वर्षभर आर्थिक उत्पन्न देऊ शकतो.

हरितगृहातील भाजीपाला उत्पादनापेक्षाही भाजीपाल्याची शास्त्रीय पद्धतीने वाढवलेली रोपे विक्रीमधून अधिक पैसा मिळतो. मांडवी, कच्छ येथील भावनाबेन पटेल ही स्त्री खजूर उत्पादनाबरोबरच आंतरपीक पद्धतीने खरबूज, टरबूज आणि आंब्याचे पीक घेते. आनंद जिल्ह्यामधील केतनभाई पटेल यांनी त्यांच्या केळीच्या बागेमधून केळी उत्पादनाबरोबर मागे उरलेल्या खोडापासून उत्कृष्ट प्रकारचे जैविक पालाश खत तयार केले. खोडाच्या धाग्यापासून विविध प्रकारच्या वस्तू, मॅट आदी साहित्य तयार करून वर्षभर आर्थिक स्रोत तयार केला; शिवाय अनेकांना रोजगारसुद्धा मिळवून दिला. आनंद तालुक्‍यामधीलच दीपेनकुमार शहा या शेतकऱ्याने शेवगा शेतीमधून शाश्‍वत आर्थिक उत्पन्न घेतले. जेव्हा शेंगेस भाव नसतो, तेव्हा ते त्यातील गर काढून, त्याची पावडर करून आयुर्वेदिक कंपन्यांना विकतात. शेवगा पाला वाळवून त्याच्या पावडरपासूनही त्यांना अर्थार्जन होते. हे सर्व शेतकरी आत्मा पारितोषिक विजेते आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे स्वप्न बाळगले आहे आणि त्यासाठी अनेक पारंपरिक योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचबरोबर शाश्‍वत शेतीच्या अर्थार्जनाबरोबर आनंद पिकविणारे हे देश-विदेशातील विविध प्रयोग इतर शेतकऱ्यांसमोर मांडावे लागतील. शासन, कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाच्या विस्तारित कक्षाने यात पुढाकार घ्यायला हवा. शाश्‍वत शेती ही ज्ञानावर, कौशल्यावर आधारलेली आणि शास्त्रीय असावयास हवी. एकाच पिकावर अवलंबून राहून ‘खळे ते बाजार’ ही पद्धत मोडून शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीस जिवंत मातीची आणि समृद्ध निसर्गाची साथ घेऊन विज्ञानाच्या, संशोधनाच्या साहाय्याने शाश्‍वतेच्या दिशेने प्रवासास सुरवात करावयास हवी. याच प्रवासात त्यांना आनंदाची कारंजी, समाधानाचे थांबे आणि संतोषाचे विसावे मिळतील. लक्ष्मीचा शाश्‍वत प्रवाससुद्धा याच मार्गाने सुरू असतो; मात्र त्यासाठी बळिराजाने योग्य मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे.
संपर्क : ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)
 

इतर संपादकीय
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
कृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...
नागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...
घातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...
संभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...
दीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाही?पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...
निर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...
सावधान! ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...
‘दगडी’ला लगाम!प्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...
शासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...
प्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...
दिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...
शेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...
‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या "असोचेम''...
वन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...
बॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...
अन्याय्य व्यापार धोकादायकचगेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर कीडनाशकांची...
‘एचटी’चा फासआगामी खरीप हंगामासाठी एचटी (हर्बिसाइड टॉलरंट)...