नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी
नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी

नांदेड ः केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेड आणि विदर्भ काॅ-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत (ता. १३) १० हजार ४४७ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ६७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील आॅनलाइन नोंदणी केलेल्या २७ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप झाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा लागणार आहे.

आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोजमाप न झाल्यामुळे हरभरा खरेदीसाठी बुधवारपर्यंतची (ता. १३) मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु या कालावधीत आलेल्या जोरदार पावसामुळे खरेदीत अडथळे आले. त्यामुळे वाढीव मुदतीत २ हजार ८६० शेतकऱ्यांच्या ४० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करता आली. नांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या आठ आणि विदर्भ मार्केटिंग काॅ-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या एका खरेदी केंद्रांवर मंगळवार (ता. २९ मे पर्यंत) २१ हजार ५३६ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली होती.

त्यापैकी ५ हजार ९५० शेतकऱ्यांचा ९१ हजार ३२६.२० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे १५ हजार ५३० शेतकऱ्यांची मोजमाप होऊ शकले नाही. परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ आणि विदर्भ मार्केटिंग काॅ-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या एका केंद्रावर ८ हजार ६७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ३८३ शेतकऱ्यांचा ४६ हजार ७५१.५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली; परंतु ५ हजार ४९० शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप झाले नाही.

हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ५ खरेदी केंद्रांवर ७ हजार ६७१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी १ हजार ११४ शेतकऱ्यांचा १७ हजार ५९६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे ६ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी होऊ शकली नाही. वाढीव मुदतीच्या काळात तीन जिल्ह्यातील एकूण २ हजार ८६० शेतकऱ्यांच्या ४० हजार ८३४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मात्र, २७ हजार ६३३ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी होऊ शकली नाही.

जिल्हानिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)
जिल्हा खरेदी शेतकरी संख्या नोंदणी केलेले शेतकरी
नांदेड ९१३२६.२ ५९५० २१५३६
परभणी ४६७५१.५ ३३८३ ८८७३
हिंगोली १७५९६.५ १११४ ७६७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com