नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१ मंडळांमध्ये अतिवृष्टी

नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१ मंडळांमध्ये अतिवृष्टी
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१ मंडळांमध्ये अतिवृष्टी

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सर्वदूर पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांतील ८१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे इसापूर, विष्णुपुरी, निम्न मनार प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पांचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शिरून पिकांची नासाडी झाली. जमिनी खरडून गेल्या. पूर्णा, दूधना, पैनगंगा, गोदावरी या प्रमुख नद्यांसह ओढे, नाल्यांना पूर लोटले. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला.

या तीन जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १६) दिवसभर तसेच शुक्रवारी (ता. १७) दुपारपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, हदगांव, किनवट, माहूर, हिमायतनगर या तालुक्यांत पावसाने कहर केला. ८० मंडळांपैकी ४१ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यापैकी २१ मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. माहूर तालुक्यातील वाई बाजार मंडळांमध्ये सर्वाधिक २३२ मिलिमीटर पाऊस झाला. प्रदीर्घ खंडानंतर आलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले असले तरी अनेक भागात पुराचे पाणी पिकांमध्ये शिरल्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले.

परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा तालुक्यांतील ७ मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. पाथरी मंडळामध्ये सर्वाधिक १४२ मिलिमीटर पाऊस झाला. दूधना, पूर्णा, करपरा नदीला पूर आले. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. औंढा नागनाथ मंडळांमध्ये सर्वाधिक १०४ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ११८, नांदेड ग्रामीण १२४, वझीराबाद १०६, वसरणी ११०, तरोडा १२५, तुप्पा १०४, लिंबगाव १२१, विष्णुपुरी १००, अर्धापूर १२२, दाभड ११५, मालेगांव ७०, हदगांव ९९, तामसा ८४, मनाठा ८०, पिंपरखेड ९६, निवघा ९४, तळणी ९६, आष्टी ८५, हिमायतनगर ११३, सरसम ७७, जवळगाव ६८, माहूर १९०, वाई बाजार २३२, वानोळा १६३, किनवट १९५.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ३७, परभणी ग्रामीण ५३, पेडगांव ६९, जांब ६६, झरी ८८, सिंगणापूर ६८, दैठणा २५, पिंगळी ४५, जिंतूर १०४,सावंगी म्हाळसा १२४, बोरी ७६,आडगांव ६०, चारठाणा ८३,  सेलू १३७, देऊळगांव ६५, वालूर ८३, कुपटा ८८, चिकलठाणा १०८, मानवत १३३, केकरजवळ ७९.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ६८, खंबाळा ५२, माळहिवरा ६४,सिरसम ९०, बासंबा ६८, नरसी नामदेव ५४, डिग्रस २७, कळमनुरी ८९, नांदापूर ९२, आखाडा बाळापूर ९३, डोंगरकडा ९५, वारंगा फाटा ८५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com