नाशिक जिल्ह्यात पावसामुळे नुकसानीचे पंचनामे

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे नुकसानीचे पंचनामे
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे नुकसानीचे पंचनामे

नाशिक : माॅन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने गेल्या तीन दिवसांत जीवित आणि वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. आंबेवाडी (ता. इगतपुरी) येथे वीज अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच ठिकठिकाणी अशा घटनांमध्ये २१ जनावरे दगावली आहेत. याखेरीज घरे, गोठे, कांदाचाळ, शेडनेट अशा २५१ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, त्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. परंतु, त्याआधीचे दोन दिवस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्यातील काही भागात थैमान घातले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. धुळवड (ता. सिन्नर) येथे निवृत्ती रामनाथ आव्हाड यांच्या घरासह लगतच्या सात ते आठ घरांचे नुकसान झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. शहा येथे ३२ घरांची अंशत: पडझड झाली असून, ग्रामपंचायत सभागृह व कांदाचाळीचे नुकसान झाले.

देवपूर येथे २१ घरे, चार पोल्ट्री शेडचे नुकसान झाले असून वीज अंगावर पडून बैल, वासराचा मृत्यू झाला आहे. वावी येथे २६ घरांचे तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांचे नुकसान झाले आहे. पांढुर्ली येथे १५ घरे, १४ गोठे व सात शेडनेटची थोडी पडझड झाली आहे. बागलाण तालुक्यातील कर्हे येथे एका वासराचा मृत्यू झाला आहे. मालेगाव तालुक्यातील पोहाणे गावात राघो देवाजी सोनवणे यांच्या बैलाचाही वीज अंगावर पडून मृत्यू झाला. याच तालुक्यातील संवदगाव येथे वादळी वाऱ्याने विजेची तार तुटली.

विजेचा धक्का बसून म्हैस, बोकड आणि तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. माल्हणगाव येथे गोठ्याचे पत्रे उडाले असून, भिंतही पडली आहे. भरविर बु. (ता. इगतपुरी) येथे तान्हाजी किसन झनकर यांच्या घराचे पत्रे उडाले. आंबेवाडीत अंगावर वीज पडून एका व्यक्तीसह तीन गायी, दोन बैलांचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे शिवनाथ त्र्यंबक गावले यांच्या एका गायीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला.

तारुखेडले येथील सदाशिव वामन शिंदे व अनंत माधव जगताप यांच्या घरांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुंदेवाडीत वीज अंगावर पडून एक महिला ४० टक्के भाजली आहे. त्यांच्यावर निफाडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळगाव येथील किरण दिनकर गवळी यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. पत्र्यांवरील दगड डोक्यात पडल्याने गवळी जखमी झाले.

येवल्यात घरांचे नुकसान येवला तालुक्यातील डोंगरगाव, सुरेगाव, गारखेडे, देवळाणे, कानडी, दुगलगाव, खैरगव्हाण, अंदरसूल, नगरसूल, विखरणी, भिंगारे या गावांमध्ये वादळी वारा आणि विजांमुळे घरांचे नुकसान झाले आहे. डोंगरगाव येथे रामेश्वर विठ्ठल सोमसे यांच्या एका बैलाचा वादळी वाऱ्याने गोठा पडून मृत्यू झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com