नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढली

नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढली
नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढली

नाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या १५ बाजार समित्यांत मिळून दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी नवीन पोळ कांद्याला क्विंटलला ७५० ते १७०० व सरासरी १४०० असे दर निघाले. बाजारात उन्हाळ कांद्याची आवकही बऱ्यापैकी होत आहे. दरम्यान मागील पंधरवड्यापासून पोळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. पोळ कांद्याला उन्हाळ कांद्याच्या तुलनेत क्विंटलला ३०० रुपयांनी अधिक दर मिळत आहे. येत्या काळात हे दर स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगामाने चांगलाच जोर धरला आहे. गत सप्ताहात पिंपळगाव बसवंत या बाजार समितीसह गिरणारे, खोरीपाडा, वणी, पांढुर्ली, घोटी, त्र्यंबकेश्‍वर या टोमॅटोच्या शिवार सौद्याच्या बाजारात टोमॅटोची आवक वाढली. टोमॅटोची दिवसाला एकूण ६ ते ७ लाख क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील बाजारात टोमॅटो २० किलो वजनाच्या क्रेटमध्ये येतात. व्यवहारही २० किलो क्रेटप्रमाणेच होतात. या वेळी प्रतिक्रेटला ४१ ते २२१ व सरासरी १४१ रुपये दर मिळाले.

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या १५ बाजार समित्या व ४५ उपबाजार आहेत. मागील पंधरवड्यात लाल कांद्याचे आगमन झाले. त्या वेळी कांद्याच्या दरात उतरण झाली होती. देशांतर्गत तसेच देशाबाहेरील बाजारात मागणी स्थिर झाल्याने त्याचा दरावर परिणाम झाला होता. या वेळी कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढविण्याच्या अफवा पसरल्यामुळे त्याचाही दरावर परिणाम झाला होता. मात्र, मागील सप्ताहापासून सरासरी दरात दोनशे ते चारशे रुपयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला. हे दर येत्या काळात टिकून राहतील, असे जाणकारांनी सांगितले.

टोमॅटोच्या बाजारात मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत सापडले आहेत. प्रतिक्रेटला सरासरी ८० त ९० रुपये हा दर परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दिवाळी सणाच्या काळात मागणी व पुरवठ्याचा समतोल बिघडतो. त्याचा परिणाम दरावर होतो. दिवाळीनंतर टोमॅटोला उठाव वाढेल, असे टोमॅटो निर्यातदार राजेश म्हैसधुणे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com