नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प

लासलगाव बाजार समिती संग्रहित छायाचित्र
लासलगाव बाजार समिती संग्रहित छायाचित्र

येवला, जि. नाशिक : कांदा उत्पादनाचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (ता. १४) सकाळी सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याने शुक्रवारी (ता. १५) जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली. त्यातच या छापासत्राने कांदा भावात २०० ते ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकमधील व्यापाऱ्यांनी कांद्यांचा साठा केल्याचा संशय असल्याने पिंपळगाव, लासलगाव, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई करीत घरे, कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेतली होती. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील या सर्व ठिकाणी चौकशी व तपासणी सुरूच असल्याचे सांगण्यात आले. कांदा व्यापाऱ्यांच्या महिन्याभरातील खरेदी-विक्री व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करून व्यापाऱ्यांच्या कार्यालयांतील महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची चर्चा आहे.

मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे ओमप्रकाश राका, कांतिलाल सुराणा, पिंपळगाव बसवंतला सोहनलाल भंडारी, सटाणात वर्धमान लुंकड, उमराण्यात खंडू पंडित देवरे, येवल्यात संतोष अटल, चांदवडला प्रवीण हेडा या व्यापाऱ्यांकडे छापामारी झाली आहे. एकाच वेळी व्यापाऱ्यांचे ऑफिस व घरे तपासली जात असून, त्यातून खरेदी-विक्री व्यवहार, बँक अकाउंटसह रोकड तपासली जात आहे. या छाप्यांबाबत प्राप्तिकर विभागाने कमालीची गुप्तता पाळली आहे.

जिल्ह्यातील कांद्याची मुख्य बाजार पेठ असलेल्या ठिकाणच्या बड्या व्यापाऱ्यांचा समावेश असल्याने या ठिकाणी बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले. या कारवाईनंतर जिल्ह्यातील बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी गुरुवारी घेतला होता. अर्थात खरेदी केलेला कांदा निकष करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. यामुळे शुक्रवारी लासलगाव, येवला, पिंपळगाव बसवत, निफाड, सटाणा, उमराणे, नामपूर या सगळ्या कांदा खरेदी करणाऱ्या महत्वाच्या बाजार समित्यात लिलाव बंद होते. उद्यादेखील शनिवारमुळे तर परवा रविवारमुळे येथील कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना अशा अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी देवळा, कळवण येथे फक्त भुसार तर मनमाड, नांदगाव, सिन्नर, झोडगे, मुंगसे येथील बाजार समिती सुरळीत सुरू होती. कांदा दर पडले गुरुवारी (ता. १४) येवल्यात लिलाव सुरु होताच बाजारभावात मोठी घसरण झालेली दिसली. सुमारे पाच हजार क्विंटल कांदा विक्रीला आला होता. या वेळी कांद्यास ५०० ते १३२८ रुपये तर सरसरी ११५० रुपये क्विंटल भाव मिळाला. हाच भाव बुधवारी ५०० ते १५४१ रुपये तर सरसरी १३०० रुपये मिळाला होता. म्हणजेच धाडसत्राचा परिणाम दरावर होऊन शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.

पथकाने केली होती पाहणी जिल्ह्यात ऑगस्टमध्ये उन्हाळ कांद्याने तीन हजारांपर्यंत दर मिळवल्याने घाऊक बाजारातील दारात वाढ झाली होती. जुलैमध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा कांदा ऑगस्ट महिन्यापर्यंत २५०० ते २८०० रुपये दराने विक्री झाल्यामुळे कांद्याच्या व्यवहाराकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. १८ ऑगस्टला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाच्या दोनसदस्यीय पथकाने लासलगावला येऊन प्रत्यक्षात कांदाउत्पादकांना फायदा होतो की नाही, याची पाहणी केली होती. तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील आठवड्यात यासंदर्भात अहवाल मागविला होता. यावरून कांद्याची साठेबाजी, भाववाढ आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारामुळे दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील कांदा व्यवहार रडारवर होते हे स्पष्ट झाले आहे. काल आम्ही साडेसहा वाजेपासून कांदा मार्केटला घेऊन आलो तर येथे आल्यानंतर नऊ वाजता आम्हाला कळाले की, व्यापाऱ्यांच्या मालावर धाडी पडल्या आहेत. लिलाव बंद असून पावसाचे वातावरण पण झाल्याने आता भावाचे का होणार हा प्रश्न आहे. - धीरज शंखपाळ, कांदा उत्पादक, लासलगाव

गुरुवारी सकाळच्या सत्रामध्ये बाजार समिती लिलाव बंद होते. दरम्यानच्या काळात व्यापाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर दुपारनंतर आलेल्या मालाचे लिलाव झाले. मात्र खरेदी कांदा निकास होत नाही मोठ्या प्रमाणावर खळ्यावर माल पडून आहे. तो निकास होत नाही म्हणून बाजार समिती बंद ठेवण्याचे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. त्याच बरोबरीने शनिवारी सुट्टी असल्याने ही बाजार समितीही बंद ठेवण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यांशी परत एकदा चर्चा केल्यानंतर सोमवारचा निर्णय घेतला जाईल. - जयदत्त होळकर, सभापती, बाजार समिती, लासलगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com