माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवा

माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवा
माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवा

सोलापूर : "शेतकऱ्यांची ज्ञान, तंत्रज्ञान घेण्याची भूक वाढली आहे. जुन्या तंत्रज्ञानापेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाकडे शेतकरी आता वळू लागले आहेत. याचा विचार करता कृषी विज्ञान केंद्रानेही आपल्या कार्यशैलीत बदल करण्याची आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वाढविण्याची गरज आहे,'' अशी सूचना पुण्याच्या कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग व संशोधन संस्थेचे (अटारी) संचालक डॉ. लखनसिंह यांनी मंगळवारी (ता. १६) येथे केली.  केंद्रीय शेतकरी कल्याण मंत्रालयअंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग व संशोधन संस्थेच्या वतीने सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तीनदिवसीय राज्यस्तरीय गळीत धान्य व कडधान्य समूह आद्यरेखा प्रात्यक्षिकावर आधारित कार्यशाळेचे उद्‍घाटन डॉ. लखनसिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक  डॉ. किरण कोकाटे, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. एम.जी. भावे, परभणी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, शबरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एल. आर. तांबडे आदी यावेळी उपस्थित होते.  डॉ. लखनसिंह म्हणाले, "गळीत, कडधान्याचे उत्पादन वाढले आहे. पण उत्पादकतावाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. उत्पादनातील नवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवणे आवश्‍यक आहे. थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोचून त्यांच्याशी संवाद वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने काम करावे. शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत हे मार्गदर्शन व्हावे. त्याशिवाय आद्यरेखा प्रात्यक्षिके घेताना शेतकऱ्यांच्या प्लॉटशेजारीच कृषि विज्ञान केंद्रानेही आपली प्रात्यक्षिके घ्यावीत, त्यातून दोन्ही प्लॉटची तुलना करताना चांगले निष्कर्ष हाती येतील. या सगळ्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवताना उत्पादकतावाढ हे उद्दिष्ट साध्य होईल, यावर भर द्यावा.'' यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामाविषयीही मार्गदर्शन केले. डॉ. कोकाटे म्हणाले, "अलीकडच्या काही वर्षांत कडधान्याच्या उत्पादनातील वाढ लक्षणीय आहे. उत्पादकता वाढीच्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राने आणखी काम वाढवण्याची गरज आहे. आद्यरेखा प्रात्यक्षिके घेताना शेतकऱ्यांची गरज, त्यांच्या समस्या, एकूण उत्पादकता या अानुषंगाने सगळ्याचा विचार करूनच ती घ्यावीत.'' डॉ. भावे यांनी कृषि विस्तार कार्यालयाला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे, असे सांगितले.  विविध तांत्रिक सत्रे राज्यभरातील सुमारे ४५ कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण चार तांत्रिक सत्रामध्ये ही कार्यशाळा पार पडणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com