अौरंगाबादला सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

औरंगाबाद ः शासनाच्या जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ येथे सोमवारी (ता. २७) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद ः शासनाच्या जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ येथे सोमवारी (ता. २७) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद : विविध क्षेत्रांत कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर स्थिती शासनाने निर्माण केली आहे. शासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (ता. २७) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

क्रांती चौक येथून दुपारी १ वाजता या मोर्चाला सुरवात झाली. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, चेलीपुरामार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोचला. या वेळी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना दिले.

या निवेदनात म्हटले, की गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ घोषणा देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक, डॉक्‍टर अशा सर्वच थरांमध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

कर्जमाफी योजनेअंतर्गंत सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रकारची सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, शेतकरी विरोधी व्यापक धोरणांमुळे गेल्या तीन वर्षांत एकाही पिकाला हमीभाव एवढा बाजारभाव मिळू शकला नाही. तत्काळ उत्पादन खर्च अधिक ५० टक्‍के नफा असे हमीभावाचे धोरण जाहीर करावे.

गुजरात राज्याच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर पाचशे रुपये प्रतिक्‍विंटल बोनस द्यावा, अादी मागण्या करत विजेची समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग रोजगारात झालेली घसरण, नागरी भागातील समस्या, आश्‍वासनाची पूर्तता, शिष्यवृत्तीचे प्रश्‍न, आरोग्याचे प्रश्‍न, आरक्षण, कुपोषण, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, अादी मुद्दे निवेदनात मांडले अाहेत.

या मोर्चात आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, काशिनाथ कोकाटे, रंगनाथ काळे, किशोर पाटील, शिवाजी बनकर, सुरजितसिंग खुंगर, मनमोहनसिंग ओबेराय, संजय वाघचौरे, अभिजित देशमुख, विनोद पाटील, मेहराज पटेल, अंकिता विधाते, छायाताई जंगले, दत्ता भांगे, गजानन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com