बोंड अळी नियंत्रणासाठी संशोधन समितीची रणनिती

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना न केल्यास २०१८ च्या हंगामातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) कपाशीवरील बोंड अळी नियंत्रणासाठी रणनीती तयार केली आहे.

अळी बोंडाच्या आत राहत असल्याने प्रादुर्भाव दिसून येत नाही. बहुतांश भागात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दुसऱ्या वेचणीदरम्यान बोंडे उमलण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. या अळीचा प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या मध्यापासून (लागवडीनंतर ९० दिवसांपासून पुढे) सुरू होतो. परंतु अलीकडील २-३ वर्षांपासून मध्य व दक्षिण भारतातील कापूस पट्ट्यात ही कीड ६० ते ७० दिवसांच्या बीटी कपाशी पिकावर प्रादुर्भाव करताना आढळून आली आहे.

प्रादुर्भावाची तीव्रता स्थानपरत्वे कमी अधिक झालेली पाहावयास मिळते. २०१७ च्या कापूस हंगामात महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही प्रमुख कापूस उत्पादक राज्ये बोंड अळीच्या सावटाखाली होती. या राज्यांमध्ये ८ ते ९२ टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला ज्यामुळे १० ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

मध्य व दक्षिण भारतातील कापूस पट्ट्यात बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठीची रणनीती खालीलप्रमाणे

  • कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर-जानेवारीदरम्यानच संपुष्टात आणणे
  • अर्धवट उमललेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकाचे अवशेष त्वरित नष्ट करावेत
  • प्रादुर्भावग्रस्त कापसाची साठवण करू नये
  • पूर्वहंगामी कपाशीची लागवड टाळावी
  • संकरित बीटी-सरळ वाणांचे बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे
  • दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे
  • शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात पेरणी करावी
  • गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रमम खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी
  • पतंगांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पेरणीच्या ४५ दिवसांनंतर हेक्टरी ५ या प्रमाणे कामगंध सापळे लावावेत
  • कपाशी पिकावर बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवेळी निरीक्षण करावे
  • लागवडीच्या ६० दिवसांनंतर निंबोळी अर्क ५ टक्के अधिक नीम तेल ५ मिलि प्रतिलिटरची एक फवारणी करावी
  • उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या अंड्यावर उपजीविका करणारा परोपजीवी मित्र कीटक ६० हजार प्रतिएकर या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तीनदा प्रसारण करावे
  • मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या कीटकनाशकांचीच फवारणी करावी. जहाल विषारी किंवा उच्च विषारी गटातील कीटकनाशकाची फवारणी टाळावी
  • कीटकनाशकाच्या मिश्राणाचा वापर टाळावा
  • पिकाचा कालावधी वाढविणाऱ्या कीटकनाशकाचा वापर सुरवातीच्या तीन महिन्यांमध्ये टाळावा
  • पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही संभावित प्रादुर्भाव करणाऱ्या कीटकनाशकाचा वापर करू नये
  • जागतिक आरोग्य संघटनानुसार वर्गीकृत अत्यंत विषारी व खूप विषारी कीटकनाशकाचा पर्यावरणाच्या दृष्टीने वापर टाळावा
  • बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळ्या झाडांची २० बोंडे फोडून पाहावीत
  • खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करून त्वरित नष्ट करावीत
  • आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग/कामगंध साबळा/दिन किंवा १ अळी /१० फुले किंवा १ अळी /१० हिरवी बोंडे) ओलांडल्यास शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशाकांचा गरजेनुसार वापर करावा
  • स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र वेचणी करून विक्री अथवा योग्य साठवणूक करावी तसेच कीडग्रस्त कापूस त्वरित नष्ट करावा
  • सूतगिरणी / जीनिंग मिलमध्ये साठविलेल्या कीडग्रस्त कापसात सुप्तअवस्थेत असलेल्या अळ्यांपासून निघणाऱ्या पतंगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पंतग नष्ट करावेत
  • शेतकरी, कृषी निविदा पुरवठादार, सूत गिरणीमालक, कापूस विक्री केंद्राचे मालक, बियाणे उत्पादक कंपन्या, कामगंध सापळे तयार करणारे उद्योजक, कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आदी कापूस शेतीसंबंधित सर्व भागधारकांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी जागृती निर्माण करण्यासाठी संबंधित राज्यांचे कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र, राज्य कृषी विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर पुढाकार घेऊन व्यापक मोहीम हाती घ्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com