नवा कीटकनाशक व्यवस्थापन कायदा आणा

नवा कीटकनाशक व्यवस्थापन कायदा आणा
नवा कीटकनाशक व्यवस्थापन कायदा आणा

मुंबई : नवा कीटकनाशक व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणून आरोग्य, पर्यावरण, सुरक्षित वापर, कीटकनाशक व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे होणारे मृत्यू व जमिनीची तसेच पर्यावरण हानीची नुकसानभरपाई या तरतुदी करणे गरजेचे आहे, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.     या संदर्भातील निवेदन तिवारी यांनी केंद्रीय निती आयोगाला सादर केले आहे.  सेंटर फॉर सायन्स अॅंड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या देशातील अग्रगण्य संस्थेच्या अहवालाचा हवाला देत शेतकरी मिशनने कीटकनाशकांच्या असुरक्षित वापरास केंद्रीय कृषी मंत्रालय तसेच राज्याचे कृषी खाते जबाबदार असून, कीटकनाशकामुळे उद्भवणारे आजारपण आणि मृत्यू टाळण्यासाठी तातडीने कीटकनाशक व्यवस्थापनातील त्रुटी दूर होणे आवश्यक असल्याचे किशोर तिवारी यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रातील कीटकनाशक बळींना मोनोक्रोटोफॉस, ऑक्सडिमेटॉन-मिथाईल, अॅसीफेट आणि प्रोफेनोफॉस यांसारखी कीटकनाशक जबाबदार अाहेत. यापैकी मोनोक्रोटोफॉस, ऑक्सीडिमेटॉन-मिथाईल ही कीटकनाशके जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक देशांमध्ये या कीटकनाशकांना बंदी आहे. यापैकी मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकावर जगातील ६० देशांमध्ये बंदी आहे. फोरेटवर ३७, तर ट्रायझोफॉसवर ४० देशांमध्ये बंदी असूनही देशात त्यांचा वापर सुरूच आहे. याकडे सीएसईने लक्ष वेधले आहे. देशात वर्ग-१ मधील १८ कीटकनाशकांच्या वापराची मुभा आहे. या कीटकनाशकांच्या वापरासाठी सुरक्षा उपकरणे वापरणे आवश्यक असून, छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ते शक्य होत नसल्याचे सीएसईने नमूद केले आहे. त्यामुळे या कीटकनाशकांवर यापूर्वीच बंदी घालणे अपेक्षित होते, असेही सीएसईने म्हटले असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या देशभरात दरवर्षी कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाच्या सुमारे १० हजार घटनांची नोंद होते. याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात कॅन्सर, किडनीचे आजार होत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा हवालाही तिवारी यांनी निती आयोगापुढे सादर केला आहे.  या कीटकनाशकांच्या वापरावर जगातील अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली असली, तरी त्यांचा भारतात सहज वापर होत आहे. श्रेणी -१ (अत्यंत घातक) या सूचीमध्ये असलेल्या सात घातक कीटकनाशकांचा भारतातील वापर ३० टक्के इतका आहे. तसेच आयएआरआयच्या केंद्रीय समितीने २०१५ मध्ये ज्या कीटकनाशकांचा वापर घातक असल्याचे नमूद केले, अशा १३ घातक कीटकनाशकांच्या वापरावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com