agriculture news in marathi, need of skilled education system, pune, maharashtra | Agrowon

पोकळ पदव्यांत हरवलेले शिक्षण
रमेश चिल्ले
रविवार, 17 डिसेंबर 2017
पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन इतर कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष दिले पाहिजे. पहिलीपासूनच निसर्गज्ञान, व्यवहारज्ञान शिकवले पाहिजे. जगताना रोज येणाऱ्या अडचणींवर मात करायला शिकवणारे कौशल्य आधारित शिक्षण मिळाले पाहिजे. नुसत्या परीक्षा, टक्केवारीचा विचार न करता कला, संगीत, खेळ, निसर्गवाचन, लघुउद्योग, शेती, घरकाम, स्वयंपाक, कलाकुसर, संभाषण, बेरजा-वजाबाक्‍या, व्यापारज्ञान अशा विविधांगी विषयांचा अभ्यासात समावेश असायला हवा. कोणत्या कौशल्याचा कुठे कसा उपयोग होईल सांगता येत नाही. भारत हा तरुणांचा देश आहे. या पिढीला पंगू करणारे शिक्षण दिले तर देशाची पुढची वाटचाल रडतखडतच होणार. प्रत्येक युवक-युवतीला मग ती खेड्यातील असो, की शहरातली. सर्वांगाने शिक्षण मिळाले पाहिजे. 
 
जुन्या काळात म्हणजे गेल्या तीस-चाळीस वर्षांपर्यंत मुला-मुलींचे शिक्षण किती झाले हे फारसे कोणी विचारात घेत नव्हते. त्यांचा कल आणि हुन्नरी कशा कशात आहे हे पाहिले जायचे. त्यावरून त्यांची गुणवत्ता तपासली जाई. एखादा मुलगा शाळेत फारसा चमकला नसेल तरी तो चांगला व्यापार करील, उत्तम शेती पिकवेल, संगीतात किंवा खेळात प्रावीण्य मिळवील, अशी परिस्थिती असायची. एखादा चांगला कारागीर बनायचा, कोणी बांधकामात तरबेज होई, नाहीतर एखादा चांगला समाजसेवक किंवा राजकारणात नाव कमावे. कुटुंबाचा व्यवसाय बारा बलुतेदारांपैकी असेल तर तो त्यांची कला उत्तम प्रकारे अवगत केलेला असायचा. म्हणून आयुष्यात पुढे त्याचे फारसे कुठे अडत नव्हते. शिक्षणातली गुणवत्ता आड येत नसायची. 
 
मुलगी असेल तर उपजतच तिच्या अंगी कला वास करायची. ती छान चित्रे काढायची. चांगले विणकाम, भरतकामात पारंगत असायची. सुबक रांगोळी काढे, गायन, नृत्य, शेती आदी कामांत तिला गती असायची. आई, बहिणींचे पाहून ती स्वयंपाकातही सुगरण व्हायची. एखादी खेळात अव्वल निघायची. घरच्यांनी अर्ध्यातच शाळेतून काढले असले, तरी तिचे कुठे काही अडायचे नाही. कुटुंबाशी प्रेमाने वागून सर्वांची मने जिंकून घेण्याची कला तिच्यात असायची. कुठलाही हिशेब असेल तो पाढ्याच्या साह्याने, कठिणातले कठीण गणित कशाच्याही आधाराशिवाय तत्परतेने सोडवले जायचे.
 
त्यामुळे मागच्या काळात म्हणजे आमच्या लहानपणी शिक्षणातल्या मार्क अन्‌ टक्केवारीच्या फुटपट्या फारशा कोणी कोणाला लावीत नव्हते. म्हणून आमचा जीव स्पर्धेच्या शर्यतीत गुदमरला नव्हता. कोणी कोणाला हुशार म्हणून जाळत नव्हता, की अडाणी म्हणून हिणवत नव्हता. म्हणून टक्केवारीच्या रेसमध्ये मागे पडलो म्हणून मानसिक आजारांचे अथवा आत्महत्यांचे प्रमाण फारसे नव्हते. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याकडे सर्वसाधारण कल असायचा. आजच्या एवढ्या शिक्षणसंस्था, शाळा, कॉलेज अन्‌ त्यातील विविध विषयांची भाऊगर्दी त्या काळी नव्हती.
 
ओट्यावरच्या, चावडी-देवळातल्या, झोपडी-झाडाखालच्या शाळेतही चांगले संस्कारक्षम, जीवनमूल्य रुजवणारे, आत्मनिर्भर करणारे, स्वाभिमानाने जगता येणारे शिक्षण त्या वेळच्या गुरुजनांकडून मिळत होते. त्याहीपेक्षा कितीतरी पटीने उत्तम शिक्षण समाज व निसर्गाकडून मिळत असावे, यावर कुणाचेही दुमत असणार नाही.
 
निर्जीव शिक्षण
आजच्या स्पर्धेच्या युगात गावा-शहरांतल्या शाळा, कॉलेज, कोचिंग क्‍लासेसच्या कोंडवाड्यातून मिळते आहे, ते केवळ अन्‌ केवळ घोकमपट्टी करून परीक्षेतील टक्केवारी वाढवण्याचे निर्जीव शिक्षण. प्रत्येक जण वयाच्या दोनेक वर्षांपासून पंचवीस-तीस वर्षांपर्यंत मृगजळामागे धावतो आहे. स्वतःबरोबर पालकांचीही दमछाक करतो आहे; आणि एवढे सगळे करून शेवटी हातात काय पडते तर पोकळ पदव्यांची भेंडोळे. त्यातून कुठलेच जिवंत असे व्यवहारज्ञान रुजत नाही. जगताना येणाऱ्या अडचणी त्यामुळे सुटत नाहीत, तर त्या उलट वाढताना दिसतात. एकूण मुलांच्या ८ ते १० टक्के (तांत्रिक शिक्षण घेणारे) विद्यार्थी सोडले तर इतरांच्या वाट्याला पदव्यांच्या कुबड्याखेरीज फारसे काही लागत नाही.
 
कौशल्यांचा अभाव
आजच्या काळात ग्रामीण भागातल्या मुलांना अवतीभवतीचा परिसर, निसर्ग, समाज, त्याचे जगणे वाचायला शिकवले जात नाहीत. बाप कसत असलेली शेती, येणारी संकटे, त्याला धैर्याने तोंड देणारे ग्रामस्थ, त्यांचे व्यवसाय त्या पुस्तकाच्या कुठल्याच पानावर नसतात. शेतातली इलेक्‍ट्रिक मोटार बिघडली, ठिबक संच चोक झाले, फिल्टरमध्ये वाळू अडकली, ट्रॅक्‍टर पंक्‍चर झाला, त्यांचे इंजिन जाम झाले, फवारणी पंप नादुरुस्त झाला, पाइपलाइन फुटली, पाणबुडी मोटार जळाली, मळणी यंत्राची पाते तुटली, रोटावेटरची फणं वाकली, डिपीचा फ्यूज गेला, स्टार्टर करंट सोडतोय, बैलाचा फरा उकळला, म्हैस पान्हा चोरतेय, शेळीला खुरकुत्या रोग झाला, कोंबड्यांना लसीकरण करायचे, दुधाचा फॅट मोजायचा, सोयाबीनचे उपपदार्थ बनवायचेत, तेलघाण्याचा रॉड जाम झालाय, टोमॅटोवर रोग पडतोय, वांगी किडताहेत, कोणती फवारणी करावी, पीक उबदऱ्या येत नाहीत, कोणती खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकमधून, फवारणीतून द्यावीत, द्राक्ष, डाळिंबांची छाटणी करायची, उसाची मोठी बांधणी करायचीय, ट्रॅक्‍टरला ट्रॉली जोडायची, घरी किचन ओट्यावरचा सिंक ठिबकतोय, हॉलमधली बेल वाजत नाही, लाइटच्या स्विचमधून करंट मारतेय, फॅन आवाज देतोय, मिक्‍सर नादुरुस्त झालाय, टीव्ही, मोबाईल, संगणक, फ्रिज, जनरेटर, स्पीकर, टेप, एसी बिघडला... पण आम्हाला यातले काहीच येत नाही. एवढे दिवस आम्हाला काय शिकवले जाते? ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊनसुद्धा साधी साधी कामे जमत नाहीत. मग आम्ही ही पदव्यांची भेंडोळे घेऊन कोणत्या तोंडाने नोकऱ्या मागतोय?
 
कुठली कला, कोणते कौशल्य आम्ही आयुष्याचे दहा, पंधरा, वीस वर्षे खर्च करून संपादन केले? एवढे पैसे, वेळ का वाया घातला? औताला एटन लावता येत नसेल तर जशी शेती करता येत नाही, तसेच एवढ्या पदव्या मिळवूनही काहीच करता येत नाही म्हटल्यावर अंगमेहनत करणाऱ्या मजुरात अन्‌ आपल्यासारख्या पदव्या घेतलेल्यात काय फरक? हा विषय एवढ्यावरच थांबत नाही. मुली, मुलाला चहा बनवता येतो, किमान भात-पिठलं करता येते तरच पोटाला चार घास मिळतील.
 
आमच्या मुलांना, मुलींना आम्ही खूप शिकवले, पण घरातला इकडच्या तांब्या तिकडे करायला दिले नाही. लग्न झाल्यावर त्यांनी काय खायचे, की हॉटेलच्या भरवशावर जगायचे? किमान जेवण करणे, फरशी धुणे, कुकर लावणे, गॅस सिलिंडर चालू करणे, इस्त्रीने कपडे प्रेस करणे, बूट चपलाला पॉलिश करणे, धुणी, भांडी, झाडलोट या असल्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या-छोट्या व साध्या गोष्टी जमत नसतील तर मग आम्ही कसले साक्षर? अक्षर साक्षरापेक्षा व्यवहार साक्षर झाले पाहिजे. किराणा, भाजी, बाजार, छोटे-मोठे घरगुती उपचार अशा बाबींत आम्ही चाणाक्ष, डोळस नसलो तर जग आम्हाला नक्की फसवणार. प्रत्येक जागी आम्ही तोंडावर पडणार. कितीही पैसा कमावला तरी तो पुरणार नाही. 
 
सर्वांगीण शिक्षण मिळावे
पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन इतर कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष दिले पाहिजे. पहिलीपासूनच निसर्गज्ञान, व्यवहारज्ञान शिकवले पाहिजे. जगताना रोज येणाऱ्या अडचणींवर मात करायला शिकवणारे कौशल्य आधारित शिक्षण मिळाले पाहिजे. नुसत्या परीक्षा, टक्केवारीचा विचार न करता कला, संगीत, खेळ, निसर्गवाचन, लघुउद्योग, शेती, घरकाम, स्वयंपाक, कलाकुसर, संभाषण, बेरजा-वजाबाक्‍या, व्यापारज्ञान अशा विविधांगी विषयांचा अभ्यासात समावेश असायला हवा. कोणत्या कौशल्याचा कुठे कसा उपयोग होईल सांगता येत नाही.
 
भारत हा तरुणांचा देश आहे. या पिढीला पंगू करणारे शिक्षण दिले तर देशाची पुढची वाटचाल रडतखडतच होणार. प्रत्येक युवक-युवतीला मग ती खेड्यातील असो, की शहरातली. सर्वांगाने शिक्षण मिळाले पाहिजे. नोकरी नाही मिळाली तरी कुठल्याही क्षेत्रात त्याला आपले कसब दाखवता येईल. कुठलेही काम करताना त्याला कमीपणा वाटणार नाही, की तो कधी निराश, दुःखी होणार नाही. त्याच्या पदवीला वजन प्राप्त होईल अन्‌ त्याचा आत्मविश्‍वास वाढून तो आत्मसन्मानाने जगेल. 
‘कुबड्या संगं चालणाऱ्याची पैज कधी जिंकत नाही
शाळेमधली पोपटपंची माणूस कधी घडवत नाही’ हे वास्तव आहे.

इतर अॅग्रो विशेष
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
मोसंबीवर मावा चिकटा वाढलाऔरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा...
विमा योजनेत हवामान केंद्रांचा घोळजळगाव ः यंदा जाहीर झालेल्या फळ पीक विमा योजनेतही...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल १००० ते ३३००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून...
मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची...मुंबई ः अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे...
अल्पभूधारक दांपत्याची प्रेरणादायी शेतीकोकण म्हटलं की भात, आंबा, काजू, नारळ आदींनी...
कपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठअलीकडील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार...
राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्तमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात...
अडचणीत आठवते शेतीआर्थिक महासत्ता, सर्वसमावेशक विकास अशा गप्पा...
रास्त दर मिळू न देणे हे षड्‌यंत्रच इसेन्शियल कमोडिटी ॲक्‍टचे भाषांतर करताना आवश्‍यक...
सार्वजनिक हेतूसाठी संपादित ग्रामीण...मुंबई : सार्वजनिक हेतूसाठी राज्यात भूसंपादन...
राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागूपुणे : वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच राज्यातील...
कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम रखडलापुणे : राज्यातील कृषी तंत्रनिकेतनचा नवा...