देशी गोवंश सुधार प्रकल्पाची २५ मे रोजी पायाभरणी

देशी गोवंश सुधार प्रकल्पाची २५ मे रोजी पायाभरणी
देशी गोवंश सुधार प्रकल्पाची २५ मे रोजी पायाभरणी

बारामती : नेदरलॅंडच्या सहकार्याने व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सेंटर फॉर एक्सलंस डेअरी हा देशातील एकमेव प्रकल्प बारामतीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत उभारला जाणार आहे. त्याची पायाभरणी येत्या २५ मे रोजी माळेगाव येथे होणार आहे. २५ मे रोजी माळेगाव येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नेदरलॅंडचे उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, प्रधान सचिव विजयकुमार, पशुसंवर्धन सचिव डॉ. कुरुंदकर, आयुक्त कांतिलाल उमाप, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार व सर्व विश्वस्त या वेळी उपस्थित राहणार आहेत.  अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हा देशातील एकमेव गोवंश सुधार प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प होण्यासाठी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी नेदरलॅंड सरकारशी चर्चा करून तेथील डेअरी तंत्रज्ञान देशात आणण्यासाठी सादरीकरण केले होते. त्यानुसार नेदरलॅंड व महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास मान्यता दिली. या प्रकल्पात देशी गीर गायी, पंढरपूर म्हशीवर संशोधन होणार आहे. दूध, शेण व गोमूत्रावर येथे संशोधन होणार असून, देशी उत्पादनाचे ब्रॅंडिंग होण्यास यामुळे मदत होणार आहे. ब्राझीलप्रमाणेच उत्तम व दर्जेदार गायी तयार होण्यासाठीही येथे संशोधन होणार आहे. या प्रकल्पाचे काम प्रकल्पप्रमुख डॉ. धनंजय भोईटे, प्रकल्प प्रभारी प्रा. नीलेश नलावडे पाहणार आहेत.  सेंटर फॉर एक्सलन्स डेअरीची मुख्य उद्दिष्टे

  • पशुसंगोपन प्रात्यक्षिके.
  • गाई, म्हशींची प्रजननक्षमता वाढीसाठी कृत्रिम रेतन प्रणाली विकास.
  • वंशसुधार व प्रतिदिनी दूध क्षमतेत वाढ.
  • रोग प्रतिकारकशक्ती व आहार व्यवस्थापनाचे उच्च तंत्र
  • संकरित गायींसाठी उष्ण कटिबंधानुसार गोठा बांधणी
  • देशी गाय-म्हशींसाठी आदर्श गोठानिर्मिती
  • पशुसंवर्धन व दुग्धविकासासाठी शेतकरी प्रशिक्षण
  • मोबाईल अॅपद्वारे संशोधनाची माहिती प्रसार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com