कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम रखडला

कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम रखडला

पुणे : राज्यातील कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम अजूनही तयार न झाल्यामुळे शैक्षणिक संस्था संभ्रमात आहेत. दुसऱ्या बाजूला तंत्रनिकेतन शिक्षण व्यवस्थेत घोळ घातल्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीदेखील पूर्ण केली आहे.

राज्यात कृषी पदविकेसाठी पाच वर्षांसाठी 2013 मध्ये अभ्यासक्रम लागू करण्यात आला होता. सुधारित अभ्यासक्रम आणि तंत्रनिकेतन शिक्षणाचे दीर्घकालीन धोरण असे दोन्ही मुद्दे किमान एक वर्ष आधीच हाताळले जाण्याची गरज होती. त्यामुळे विद्यार्थी, अध्यापक आणि कृषी शिक्षण संस्थांना नियोजन करण्यास वाव मिळाला असता. मात्र, विद्यापीठे आणि शासनही सुस्त राहिल्याने आता तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

विद्यापीठांच्या म्हणण्यानुसार तंत्रनिकेतन शिक्षणाची घडी व्यवस्थित करण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न सुरू झालेले आहेत. तथापि, शासनाच्या पातळीवर अचानक काही निर्णय होत असल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. कृषी तंत्रनिकेतनच्या पदविकाधारकांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश न देण्याचा निर्णयदेखील शासनाचाच आहे. त्याच्याशी विद्यापीठांचा संबंध नाही, असा दावा विद्यापीठ सूत्रांनी केला आहे.

"कृषी तंत्रनिकेतनचा सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांची बैठक दापोली कृषी विद्यापीठात पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अभ्यास मंडळाचे सदस्य एकत्र येवून कृषी तंत्रनिकेतनचे दीर्घकालीन धोरण निश्चित करतील. पदविका आणि पदवीच्या अभ्यासक्रमात कोणतीही त्रुटी न ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही विद्यापीठांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तंत्रनिकेतनच्या शिक्षणक्रमात शासनाकडून करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलाला आव्हान देण्यासाठी त्रस्त विद्यार्थी न्यायालयात जात आहेत. याचिकेची अत्यावश्यक तयारीदेखील विद्यार्थ्यांनी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोरदेखील विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. दुसऱ्या बाजूला कृषी संस्थाचालकदेखील ही समस्या मांडणार आहेत. “भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद तसेच राज्य शासनाच्या प्रतिनिधींसमोर आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत,” असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

पदवीसाठी 124 श्रेयांक पूर्ण करण्याचा प्रयत्न कृषी पदवीसाठी नवा अभ्यासक्रम 183 श्रेयांकाचा आहे. त्यामुळे आता तंत्रनिकेतनचा सुधारित अभ्यासक्रम तयार करताना तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम हा तीन वर्षात 124 श्रेयांक पूर्ण करणारा असावा, असा प्रयत्न चालू आहे. त्यातील 44 श्रेयांक हे कृषी पदवीच्या पहिल्या वर्षाचे असतील. त्यामुळे तंत्रनिकेतन उत्तीर्ण विद्यार्थ्याला कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळून उर्वरित 139 श्रेयांक पूर्ण करून कृषी पदवी मिळवता येईल, असा प्रस्तावदेखील मांडला जात आहे.

शास्त्रज्ञ ठरविणार तंत्रनिकेतनचे दीर्घकालीन धोरण राज्यातील कृषी तंत्रनिकेतनचा सुधारित अभ्यासक्रम आणि धोरण ठरविण्याची मुख्य जबाबदारी राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहयोगी अधिष्ठात्याच्या नेतृत्वाखालील मंडळाला देण्यात आली आहे. दापोली, परभणी आणि अकोला कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता या मंडळात असतील. कृषी तंत्र विद्यालयातील प्राचार्यांनादेखील मंडळात स्थान देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com