कर्नाटकात मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डाचा प्रादुर्भाव

मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डाचा प्रादुर्भाव
मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डाचा प्रादुर्भाव

बंगळूर ः कर्नाटक राज्यात चिकबल्लारपूर भागात मका पिकात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा (लष्करी अळीचा एक प्रकार) नावाची नवी कीड मका पिकात आढळली आहे. वेगाने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव व क्षेत्र विस्तार करण्याची क्षमता असलेल्या या किडीचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आढळले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळूर येथील ‘एनबीएआयआर’ या संस्थेने या किडीच्या धोक्याबाबत वेळीच सावध करीत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.  स्पोडोप्टेरा लिट्युरा ही भारतातील बहुपीकभक्षी कीड मानली जाते. महाराष्ट्रासह देशभरात या किडीने उग्र स्वरूप धारण केले आहे. आता याच जातकुळातील आणखी एका किडीची नोंद कर्नाटक राज्यात नुकतीच झाली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) बंगळूर येथील ‘एनबीएआयआर’ संस्थेने त्याबाबत शेतकरी व तज्ज्ञांसाठी इशारा देणारे पत्रक जारी केले आहे. ही संस्था शेतीतील उपयोगी कीटकांबाबत संशोधन करते.  ‘एनबीएआयआर’ संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने ९ जुले ते १२ जुलै या कालावधीत कर्नाटक राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली. यात स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा या नव्या किडीची नोंद चिकबल्लारपूर येथे प्रामुख्याने आढळली आहे. संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. ए. एन. शैल्य यांनी यासंबंधीची निरीक्षणे नोंदवली आहेत. या किडीचे प्रमाण साधारण ७० टक्क्यांपर्यंत अाढळले आहे. अत्यंत वेगाने अधिक क्षेत्रावर प्रादुर्भाव व नुकसान करण्याची क्षमता या किडीत आहे. मुख्य म्हणजे मका हे महाराष्ट्रासह भारताचे मुख्य पीक आहे. त्यामुळे वेळीच सतर्कता न बाळगल्यास कर्नाटकातील प्रादुर्भावाची व्याप्ती पुढे या राज्यासह अन्य राज्यातही गंभीर रूप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पुढील अभ्यासाला गती कर्नाटक राज्यातील हसन, बेलूर व शिमोगा या भागांतही या किडीचा प्रादुर्भाव आढळल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणाहून किडीचे नमुनेही घेण्यात आले आहेत. स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा या प्रजातीच्या या अळीची रेण्वीय तंत्रज्ञानाद्वारे अोळख पटवण्यातही ‘एनबीएआरआय’चे शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत. किडीच्या संदर्भाने पुढील अभ्यासही सुरू असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com