पाण्याचा ताण सहन करणारा केळीचा ‘साबा' वाण लवकरच

आम्ही आतापर्यंत ३४२ देशी वाण आणि १२५ परदेशी वाणांवर काम करत आहोत. त्यामध्ये देशी वाणावर भर आहे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणावर विशेष संशोधन करीत आहोत. त्यातूनच उदयम वाण निवडले. आता साबा, बॅंगियर, नमवाकोम या वाणावर अंतिम संशोधन सुरू आहे. त्यापैकी "साबा'' हा वाण विकसित झाला आहे, पाण्याचा ताण सहन करू शकणारा हा वाण लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोचेल. - डॉ. सौ. एस. उमा, केंद्र संचालक, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची
साबा केळीचा घड
साबा केळीचा घड

त्रिची, तमिळनाडू ः कमी पाऊसमान आणि सातत्याच्या दुष्काळी स्थितीमुळे केळी उत्पादकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. या परिस्थितीत केळी पिकाचे मोठे नुकसान होते. या समस्येचा विचार करून त्रिचीच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात गेल्या काही वर्षापासून विविध वाणांवर संशोधन सुरू असून, पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या केळी वाणावरील संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे. `साबा' असे या वाणाचे नाव असून, लवकरच हा वाण शेतकऱ्यांच्या शेतावर पोचणार आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.  केळी हे तसे भरपूर पाणी पिणारे फळपीक आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रदेशातच केळीचे सर्वाधिक उत्पादन होते. पण पाण्याचा ताण सहन करणाऱ्या या वाणामुळे एक चांगला पर्याय महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना मिळणार आहे.  दक्षिण भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली लालकेळी, विलायची, मुंथन, नेंद्रन, तर महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशात चालणारे ग्रॅण्ड-९ हे वाण आपली वेगळी ओळख राखून आहेत. या सगळ्या वाणावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात आतापर्यंत बरेचसे संशोधन झाले आणि अद्यापही होत आहे. पण गेल्या आठ-दहा वर्षापासून केळीच्या नव्या वाणावरही संशोधन केंद्राने भर दिला आहे. त्यातूनच कर्पूरवल्ली या स्थानिक देशी वाणातून निवड पद्धतीने तयार झालेले ‘दयम' हे वाण सध्या शेतकऱ्यांच्या शेतावर पोचले आहे. पण देशातील बहुतांश भागात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळ आणि कमी पाऊसमानाच्या स्थितीवर मात करणाऱ्या वाणावरही केंद्राने गेल्या काही वर्षात संशोधन सुरू केले. त्याचाच भाग म्हणून केंद्राने पहिल्या टप्प्यात १२ वाण त्यासाठी निवडले. त्यातून टप्प्याटप्प्याने पाच आणि आता अंतिमतः एक असा अभ्यास करत ‘साबा' हा दुष्काळी आणि कमी पाण्यावर येऊ शकणारा वाण विकसित केला आहे. चांगली उत्पादनक्षमता आणि चव ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत. असा आहे ‘साबा' वाण फिलिपाइन्समधील केळी वाणातून निवडलेला हा वाण आहे. पाण्याचा ताण सहन करणारा विशेषतः दुष्काळी आणि कमी पाऊसमानाच्या प्रदेशात त्याची लागवड होऊ शकते. याचे झाड मध्यम आकाराचे आहे, सर्वाधिक साडेतीन मीटर उंचीपर्यंत ते जाऊ शकते. पाने गडद हिरवी आणि चमकदार आहेत. या झाडाला नऊ ते दहा गुच्छ येतात. एका घडाचे वजन साधारण २६ ते २९ किलोपर्यंत मिळते. ३६० ते ३८० दिवसात ते परिपक्व होते. पिकवून खाण्यायोग्य केळीसाठी त्याचा सर्वाधिक उपयोग आहे. केळीचा आकार काहीसा लहान आहे, पण चव, रंग आणि गुणवत्ता खूपच चांगली आहे. गेल्या काही वर्षापासून प्रयोग केल्यांतर २०१६-२०१७ मध्ये पहिल्यांदा त्याची चाचणी घेण्यात आली. आता या वाणाचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. केळी उत्पादनात भारत अव्वल केळी हे भारतातील अनन्यसाधारण फळपीक आहे. ऊर्जावर्धक अशी ओळख असलेल्या या फळाचे उत्पादन जगभरातील १२० देशांमध्ये घेतले जाते. पण त्यात सर्वाधिक केळी उत्पादक देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. फिलिपाइन्स, बेल्जियम आदी देश केळी उत्पादनात भारताशी स्पर्धा करतात. पण प्रत्येक वेळी भारत या देशांना मागे टाकते आहे. आजही वर्षाकाठी भारतात १६.९ दशलक्ष टन इतके केळीचे उत्पादन होते. एकूणच भारतीय देशी केळीची गुणवत्ता, चव, रंग आणि विशेषतः त्याच्यातील पोषक अन्नघटक या जोरावर भारतीय केळीला युरोपसह अरब अमिराती देशांमध्ये मोठी पंसती मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com