मध, परागकणांच्या साठ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत तीन जिवाणू ओळखले

प्रचंड धावपळ आणि कष्टानंतर मधमाश्यांनी जमा केलेले मध, परागकण साठे टिकवण्यासामध्ये कार्यरत तीन जिवाणू ओळखले आहेत. (स्रोत ः कॅलिफोर्निया विद्यापीठ)
प्रचंड धावपळ आणि कष्टानंतर मधमाश्यांनी जमा केलेले मध, परागकण साठे टिकवण्यासामध्ये कार्यरत तीन जिवाणू ओळखले आहेत. (स्रोत ः कॅलिफोर्निया विद्यापीठ)

मधमाश्यांनी आपल्या अळ्यांसाठी गोळा केलेले मध आणि परागकणांचे साठे वाया जाण्यापासून वाचवणारे तीन जिवाणू ओळखण्यात कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ सिस्टेमॅटिक अॅण्ड इव्हॅल्युशनरी मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ क्लाइन मॅकफ्रेडेरिक यांच्या नेतृत्वाखालील संशोधक गटाने जंगली मधमाश्या आणि फुलांमध्ये आजवर अज्ञात असलेले तीन जिवाणू वेगळे केले आहेत. लॅक्टोबॅसीलस गणातील हे जिवाणू मधमाश्यांनी आपल्या अळ्यांसाठी साठवलेल्या मध आणि परागकणांच्या साठ्याच्या सुरक्षिततेमध्ये मोलाची कामगिरी बजावत असल्याचे दिसून आले आहे. मधमाश्यांच्या पचनसंस्थेमध्ये सहजिवी पद्धतीने कार्यरत असणारे जिवाणू अन्नाच्या पचनासह प्रतिकारता वाढवण्यासाठी मदत करत असल्याचे मानले जाते. मधमाशी आणि जंगली मधमाशी (बंबलबी) यातील जंगली मधमाश्यांच्या पचनसंस्थेतील जिवाणू समुदायाबाबत तुलनेने कमी माहिती उपलब्ध आहे. वास्तविक विविध वनस्पती प्रजातींच्या परागीकरणामध्ये जंगली मधमाश्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

  • संशोधकांनी टेक्सास आणि कॅलिफोर्निया येथील दोन ठिकाणांवरील जंगली मधमाश्या आणि फुलांचा अभ्यास केला. विशेषतः त्यांच्या पचनसंस्थेतील जिवाणूंचा जनुकीय अभ्यास करून तीन प्रजाती वेगळ्या मिळवल्या आहेत. या लॅक्टोबॅसिलस प्रजाती पूर्वीच्या लॅक्टोबॅसिलस कुन्कीई (Lactobacillus kunkeei) हिच्या जवळच्या आहेत.
  • लॅक्टोबॅसिलस जिवाणू प्रजाती या प्रामुख्याने दुग्ध उत्पादन साठवण, भाजीपाला व अन्य उत्पादनाच्या किण्वन प्रक्रियेमध्ये वापरल्या जातात.
  • नव्याने आढळलेल्या जाती पोळ्यामध्ये साठवलेल्या मध आणि परागकणांवर वाढणाऱ्या बुरशीला प्रतिरोध करतात. मध आणि परागांनी भरलेल्या कप्प्यामध्ये अंडी घातल्यानंतर त्यातून अळी बाहेर येण्यासाठी काही दिवस लागतात. त्यानंतर बाहेर आलेली अळी काही आठवडे त्यावर जगते. त्यामुळे जमा केलेले साठे बुरशींमुळे खराब होऊन अळ्यांचा उपासमार होण्याचा धोका असतो. तो या जिवाणूंमुळे टाळला जातो, असे संशोधकांचे मत आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जिवाणू जंगली फुले आणि मधमाश्या दोन्हीमध्ये जगू शकतात. दोन वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये जगण्याची क्षमता असणाऱ्या फारच मर्यादित प्रजाती ज्ञात असल्याचे मॅकफ्रेडेरिक यांनी सांगितले.
  • नव्या जाती ः

  • लॅक्टोबॅसीलस मिचेनेरी (Lactobacillus micheneri) - हे नाव मधमाश्यांच्या नैसर्गिक रहिवासाबाबत संशोधन करणाऱ्या चार्ल्स डी. मिचेनेर यांच्यावरून ठेवले आहे.
  • लॅक्टोबॅसीलस टिबेरलकेई ( Lactobacillus timberlakei) - हे नाव स्थानिक मधमाश्यांच्या शरीररचनेविषयी महत्त्वाचे संशोधन करणआरे फिलिल टिबेरलेक यांच्यावरून ठेवले आहे.
  • लॅक्टोबॅसीलस क्वेन्युई (Lactobacillus quenuiae) - हे नाव हॅलिक्टीज मधमाश्यांच्या सामाजिक जीवशास्त्राच्या संशोधनासाठी संशोधिका सेसिली प्लॅट्यूएक्स- क्वेन्यू यांच्यावरून ठेवले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com