दुसऱ्या दिवशीही दूध आंदोलनाचे पडसाद कायम

दुसऱ्या दिवशीही दूध आंदोलनाचे पडसाद कायम
दुसऱ्या दिवशीही दूध आंदोलनाचे पडसाद कायम

सोलापूर : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून सुरू केलेले आंदोलन मंगळवारी (ता. १६) सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. दक्षिण सोलापुरातील मंद्रूपला सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर सांगोल्यात महूदला हलगी वाजवून दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. पंढरपुरातील पटवर्धनकुरोलीत मात्र दूध उत्पादकांच्या आंदोलकांविरुद्ध बोलणाऱ्या दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागांत दिवसभर असे वेगवेगळे पडसाद उमटत राहिले.

खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाची सुरवातच सोलापूर जिल्ह्यात पंढरपुरातून केल्याने इथले कार्यकर्ते हे आंदोलन तीव्र करण्याच्या प्रयत्नांत आहेत.  मंगळवारी सोलापूर जिल्हा दूध संघासह खासगी दूध संघाकडील संकलन बंद राहिले. काही ठिकाणी किरकोळ वाहतूक आणि विक्री झाली, तिथे मात्र कार्यकर्त्यांनी तत्काळ हे दूध रोखून आंदोलन केले. मंद्रूपला स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-विजापूर महामार्गावर सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन झाले. त्यामुळे सुमारे पाऊण तासापेक्षाही जास्त काळ इथली वाहतूक रखडली.

सरकारकडून आणि दुग्धविकास मंत्र्यांकडून आमच्या आंदोलनावर उमटलेल्या प्रतिक्रियांवरही या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी जिल्हा सचिव उमाशंकर पाटील, पोपट साठे, इक्‍बाल मुजावर, डॉ. शिवानंद जळकोटे, चाँद यादगिरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. दुसरीकडे जिल्ह्यात सांगोला तालुक्‍यात महूदला मोफत दूधवाटप करून निषेध करण्यात आला. तसेच पंढरपुरातील पटवर्धनकुरोलीत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतले, तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com