शेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्‍वत ग्रामविकास

सरुर (जि.वर्धा) येथील शेतामध्ये फेरोमोन सापळे लावताना कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
सरुर (जि.वर्धा) येथील शेतामध्ये फेरोमोन सापळे लावताना कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यात ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शेती विकासाच्या बरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून पूरक उद्योगांना चालना दिलेली आहे. गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विविध गावांमध्ये आरोग्य आणि पशू चिकित्सा शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्थेच्या उपक्रमाला गावकऱ्यांचीही मोलाची साथ लाभली आहे.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था ही महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, वर्धा याचबरोबरीने राजस्थानातील सिकर आणि उत्तराखंड राज्यांतील पंतनगर येथे ग्रामविकासचे विविध उपक्रम राबविते. संस्थेने आर्थिकदृष्ट्या सक्षम गाव उभारण्यावर भर दिला आहे. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहूल बजाज यांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यातील विविध गावांतील शाळांच्या सक्षमीकरणाची मोहीम हाती घेतली. संस्थेने ग्रामविकासाला पूरक उपक्रमांची जोड दिली आहे. वर्धा जिल्ह्यातील ७३७ शाळांमध्ये ईलर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या शाळांमध्ये कमीतकमी २० विद्यार्थी असावेत, अशी अट आहे. एलईडी टीव्ही, एलसीडी, प्रोजेक्‍टर, शिक्षणाकरिता पूरक सॉफ्टवेअर, लॅपटॉप अशा सुविधा आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ आज वर्धा जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ५१ हजार ३६४ विद्यार्थी घेत आहेत, अशी माहिती संस्थेचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक विनेश काकडे यांनी दिली. 

आरोग्य सुविधांवर भर  

  • संस्थेद्वारे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन. या माध्यमातून १२६ व्यक्‍तींच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. 
  •  ग्रामीण भागातील महिलांची हिमोग्लोबीन तपासणी. त्यातील अहवालाच्या आधारे संतुलित आहार याविषयी जागृती उपक्रम.
  • तीस गावांमध्ये सुमारे ३०० परसबागांची उभारणी.
  • शेती विकासाला चालना 

  •  वर्धा जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांच्याकडे ज्वारी लागवडीचे प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्यात आले. शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरविले गेले. 
  •  येत्या काळात ज्वारीच्या मालदांडी जातीच्या लागवडीकरिता १००, जवस लागवडीसाठी ३० आणि २० शेतकऱ्यांना भुईमूग लागवडीकरिता प्रोत्साहन दिले जाणार आहे. 
  • गेल्यावर्षी १३० शेतकऱ्यांच्या शेतावर कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्यात आले होते. याद्वारे खरिपात पहिल्यांदा कांदा लागवड झाली.
  •   शिक्षा मंडळाचे रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय आहे. या ठिकाणी दरवर्षी दुर्गम भागातील  ५०० शेतकऱ्यांना मोफत माती परिक्षण करून दिले जाते.  कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा रावे उपक्रम संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावात होतो. 
  • संस्थेने विहीर खोलीकरणाकरिता १०५ शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली.  ठिबक आणि तुषारकरिता शासनाचे अनुदान मिळते, त्याच्या जोडीला संस्थेकडून प्रोत्साहनपर पाच हजार रुपये अतिरिक्‍त दिले जातात. यामुळे अनेक गावांमध्ये ठिबक आणि तुषार संच बसविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. वर्धा जिल्ह्यात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १३२ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. 
  • उद्योग, व्यवसाय उभारण्याची इच्छा असलेल्या परंतु आर्थिक सोय नसलेल्या बचतगटांसाठी फिरत्या निधीची उपलब्धता संस्थेने केली आहे. कर्ज घेतलेल्या गटातील सदस्याला दरवर्षी एप्रिल महिन्यात परतफेड करावी लागते. हा परतफेड रकमेचा धनादेश दुसऱ्या गटाच्या नावे केला जातो. यामुळे दुसऱ्या गटातील सदस्यांना पूरक उद्योगासाठी आर्थिक सोय होते. अशाप्रकारचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • पूरक उद्योगांसाठी मदत  संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी याकरितादेखील प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत दुधाळ जनावरांचे  ५० टक्‍के अनुदानावर वाटप करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील तीस गावांमध्ये दुधाळ जनावरे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. ज्या गावांमध्ये रोजगाराच्या शोधार्थ मोठ्या प्रमाणावर हंगामी स्थलांतर होते, अशा गावांना या योजनेच्या अंमलबजावणीकरिता प्राधान्य देण्यात आले. या अंतर्गत १९१ गाई, ६२ म्हशींचे वाटप झाले. चार शेळ्या आणि एक बोकड याप्रमाणे एक युनिट निश्‍चीत करण्यात आले. त्यानुसार काही गावांमध्ये १२१ शेळी युनिटचे वाटप झाले. ऊन, वारा, पावसापासून जनावरांचे संरक्षण व्हावे याकरिता छत असलेला गोठा शेतकऱ्यांना उभा करून दिला. गोमूत्राचा वापर शेतीमध्ये वाढीस लागला आहे. ते संकलित करण्याकरिता खड्डा,तसेच जनावरांना बसण्याकरिता कोबा, चारा टाकण्यासाठी गव्हाण अशाप्रकारच्या मूलभूत सुविधांचा मॉडेल गोठा संस्थेने तयार केला. अशाप्रकारचे ५६ गोठे विविध शेतकऱ्यांकडे बांधून देण्यात आले. 

  • दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यात आलेल्या पशुपालकांनी हायड्रोपोनीक्स पद्धतीने चारानिर्मितीसाठी  पुढाकार घेतला. 
  •  गोमूत्राचा वापर करुन काही शेतकरी जीवामृत तयार करतात. पिकांसाठी याचा वापर वाढीस लागला आहे.शेतकरी आता सेंद्रीय पद्धतीने पीक व्यवस्थापनावर भर देत आहेत. 
  • ज्या दुर्गम गावांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पोचत नाहीत, अशा गावांमध्ये संस्थेच्या वतीने पशू आरोग्य शिबिर घेतले जाते. वर्षभरात सुमारे ६० पशुवैद्यक शिबिरांचे आयोजन होते. या वेळी जनावरांच्या उपचारासाठी औषधांचा मोफत पुरवठा केला जातो.
  • शैक्षणिक उपक्रम

  •  संस्थेने बोलकी अंगणवाडी ही अभिनव संकल्पना राबवली आहे. या अंतर्गंत अंगणवाड्यांच्या भिंतीवर जंगली प्राणी, पाळीव प्राण्यांचे चित्रे, बडबडगीते भिंतीवर साकारली आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी अध्ययन सोपे झाले आणि विद्यार्थ्यांनादेखील लवकर समजते. सुमारे वीस अंगणवाड्यांच्या भिंती संस्थेच्या माध्यमातून बोलक्‍या झाल्या आहेत. या वीस अंगणवाड्यांमध्ये खेळण्याचे साहित्य, फॅन, कपाट, ग्रंथालयाकरिता बुकसेल्फ, लाऊडस्पीकर संच, बॅंडपथक साहित्यदेखील निशुल्क पुरविले. 
  • ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई लर्निंगची सुविधा त्याचबरोबरीने या शाळांमधील शिक्षकांसाठी संगणक चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आले. 
  • विद्यार्थ्यांचे अवांतर ज्ञान वाढावे, त्यांना परिसराची ओळख व्हावी या उद्देशाने संस्थेच्या वतीने दरवर्षी रमन सायन्स सेंटर, बजाज सायन्स सेंटर, बापुकूटी, गिताई मंदिर या ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या भागातील उद्योग, इतिहास जाणून घेतात. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाच या सहलींमध्ये सहभागी करून घेतले जाते.
  •  वर्धा जिल्ह्यातील सुमारे ३५ जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधली. तसेच ७५ स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीवर देखील भर दिला गेला. ३७ शाळा वर्गखोल्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यासोबतच नव्याने नऊ वर्ग खोल्या बांधून देण्यात आल्या आहेत. शाळा सुरक्षित व्हाव्या या उद्देशाने चार शाळांमध्ये आवारभिंतीचे काम करण्यात आले.
  • - विनेश काकडे ( सहायक प्रकल्प व्यवस्थापक) ९८५०४८५६५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com