एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंत

एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंत
एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंत

पुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असल्यामुळे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळा (एनएचबी)च्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालकांना पदावरून तातडीने हटवावे, अशी शिफारस एका विभागाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे एका पत्रान्वये करण्यात आली आहे.  “राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अर्थात एनएचबीच्या कामकाजाबाबत नाराजी होतीच. पण, आता थेट पंतप्रधानांपर्यंत वाद गेला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांना काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रालयातील एका विभागाकडून तसे पत्र (क्रमांक ५२६७-२०१९) पाठविण्यात आले आहे. अर्थात, एनएचबीत अद्याप तरी प्रशासकीय बदल झालेला नाही,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्र्यांची स्वाक्षरी असलेल्या या पत्राची प्रत केंद्रीय कृषी मंत्रालयालादेखील देण्यात आली आहे. कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडून या पत्राबाबत काय कार्यवाही झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, लोकसभा निवडणुका व आचारसंहिता असल्यामुळे एनएचबीच्या प्रमुखांना हटविण्याचे तूर्त टाळण्यात आले असावे, असा अंदाज एनएचबीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. एनएचबीचे देशाचे मुख्यालय हरियाणाच्या गुरगाव भागात आहे. तेथील व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे डॉ. एम. अरिज अहमद यांच्याकडे एप्रिल २०१८ पासून आहेत. हेकेखोर आणि शेतकरीविरोधी असल्याचा आरोप होत असलेले श्री. अहमद हे ज्येष्ठ आयएएस अधिकारी असून, ते आसाम केडरचे आहेत. प्रतिनियुक्तीवर त्यांना एनएचबीचे प्रशासकीय प्रमुख करण्यात आलेले आहे.  कृषी पदवीधारक आणि अनुवंशशास्त्राचे पदव्युत्तर यातून पुढे आयएएस झालेले श्री. अहमद कृषिक्षेत्रातील जाणकार समजले जातात. त्यांनी आसामच्या कृषी मंत्रालयापासून ते केंद्रीय कृषी मंत्रालयात सहसचिव या पदावर काम केलेले आहेत. त्यामुळे कृषिक्षेत्राशी संबंधित हा अधिकारी खरोखर शेतकरीविरोधी आहे की त्यांना हटविण्यासाठी इतर काही कारणे आहेत, असा देखील संभ्रम कर्मचाऱ्यांमध्ये आहे.   ‘श्री. अहमद यांना एनएचबीत काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे ते शेतकरीविरोधी भूमिका घेतात. शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. शेतकऱ्यांच्या छळणाऱ्या या अधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी शिफारस या पत्रात करण्यात आली आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.   दरम्यान, याबाबत श्री. अहमद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, एनएचबीकडून महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. एनएचबीमधील काही कर्मचारी मात्र निधी घटविण्यामागे मुख्यालय नव्हे, तर राज्यातील दलालांची लॉबी कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. “केंद्रीय कृषिमंत्रिपदी शरद पवार असताना एनएचबीचा मोठया प्रमाणात निधी राज्यासाठी मंजूर केला जात होता. मात्र, राधामोहन सिंह यांनी या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उत्तर भारताकडे निधी वळविण्याचे धोरण ठेवले,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.  शेतकरीविरोधकांची झाली होती उचलबांगडी  एनएचबीच्या महाराष्ट्रातील प्रादेशिक अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिल्याबद्दल तक्रारी गेल्या होत्या. अधिकारी आणि दलाल यांच्या साटेलोट्यातून गरजू शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे छळ केला गेला आहे. “या तक्रारींमुळे दोन अधिका-यांची उचलबांगडी करण्यात आली. एकाची छत्तीसगडला, तर दुसऱ्याला हरियानात बदली केली गेली होती. आताचे अधिकारी चांगले आहेत, पण निधी नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com