हार्वेस्टरने नऊ एकरांतील तूर काढली बारा तासांत ! पहा व्हिडिओ..

अंबाजोगाई, जि. बीड : जवळगाव येथील हारे यांच्या शेतात हार्वेस्टरद्वारे सुरू असलेली तुरीची काढणी.
अंबाजोगाई, जि. बीड : जवळगाव येथील हारे यांच्या शेतात हार्वेस्टरद्वारे सुरू असलेली तुरीची काढणी.

अंबाजोगाई, जि. बीड : वेळ, श्रम आणि पैसा वाचविण्यासोबतच मजुरांच्या अडचणीवर मात करण्यासाठी अंबाजोगाई तालुक्‍यातील जवळगावच्या पांडूरंग हारे यांनी तूर काढण्यासाठी हार्वेस्टरचा वापर केला. त्यामुळे त्यांचे पैसे तर वाचलेच सोबतच पुढची पेरणी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने जो वेळ लागणार होता तो सुद्धा वाचला. श्री. हारे यांनी केवळ १२ तासांत नऊ एकरांतील तूर काढली असून त्यांच्या या प्रयोगाने जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍नदेखील सुटला आहे.

शेतीशी वंशपरंपरने जुळलेली नाळ सहज तुटत नाही. काही शेतकरी प्रयोगशिलतेचा वापर करतात तर काही परंपरेने चालत आलेल्या पिकांची शेतीच पुढे नेतात. बीड जिल्ह्यातील ॲड. पांडूरंग रामभाऊ हारे यांनी पिकाचे शास्त्र समजून घेत त्यामध्ये परिस्थितीनुरूप बदल करताना संकटाचा सामना व अडचणीवर पर्याय काढत शेतीला शाश्वत व फायद्याची करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पस्तीस वर्षांपासून एक प्रयोगशील व उत्पादन खर्चाला परवडेल अशी शेती करणारे शेतकरी म्हणून पांडूरंग हारेंकडे पाहिलं जातं. १९८८ पासून २००७ पर्यंत शेतीबरोबरच वकिलीही करणारे पांडूरंग हारे त्यानंतर पूर्णवेळ शेतीत रमले आहेत. आपल्या या शेतीच्या अनुभवात त्यांनी पारंपरिक पिकाव्यतिरीक्‍त अनेक पिकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. पीक बदलातून शेतीला तंत्रज्ञानाची जोड देताना पांडुरंग हारेंनी आपला उत्साह तसूभरही कमी होऊ दिला नाही. पहा व्हिडिओ...

आपल्या शेतीच्या कार्यकाळात पांडुरंग हारे यांनी आठ वेगवेगळ्या पिकांचा अनुभव घेतला आहे. त्यामध्ये ऊस, डाळिंब, पपई, अद्रक, हळद, केळी पीक घेणाऱ्या पांडूरंग हारेंनी अंबाजोगाई तालुक्‍यात पहिल्यांदा टरबूज शेतीचा प्रयोग केला तो १९८० मध्ये. त्या वेळी फक्‍त नदीच्या वाळूतच टरबूज येऊ शकतं याची कल्पना त्या भागातील शेतकऱ्यांना होती.

त्यानंतर गतवर्षी बेडवर बीडीएन ७११ या तुरीच्या वाणाची लागवड केली. तोच कित्ता गिरवत ॲड. हारेंनी यंदाही नऊ एकरात सात फूट अंतरावर बेडवर तुरीची लागवड केली. त्यामध्ये तीन तासं सोयबीनची घेतली. या तुरीसाठी ठिबकची सोय केली होती, जवळपास चार ते पाच क्‍विंटल एकरी सोयाबीनचेही उत्पादन त्यांना झाले.

नऊ एकरात जवळपास ९० ते ९५ क्‍विंटल तूर झाली. पूर्वी हार्वेस्टरने पीक काढल्यास गुळी (कुटार) मिळत नव्हते. आता एका कप्प्यात धान्य व एका कप्प्यात कुटार जमा होत असल्याने जनावरांसाठी चाराही मिळत असल्याचे ऍड. पांडूरंग हारे यांनी सांगितले.

अशी काढली तूर काढणीला आलेल्या तुरीसाठी मजूर मिळण्याची अडचण व यंदा पाण्याची सोय असल्याने लागलीच उसाची लागवड करण्याची इच्छा ॲड. हारे यांची होती. यावर पर्यायासाठी त्यांनी हार्वेस्टरने तूर काढण्याचा निर्णय घेतला. तूर काढणीसाठी हार्वेस्टरला दोन हजार रुपये एकरी दर देण्यात आला. ज्या ठिकाणी मजुराच्या हाताने काढण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी व किमान चाळीस हजार रुपये खर्च लागला असता, ती तूर केवळ बारा तासांत व वीस हजारात काढणे त्यांना शक्‍य झाले. शिवाय पारंपरिक पद्‌धतीने काढल्यांनतर होणारी फूटही वाचल्याचं ते सांगतात.

मजूर मिळणं अवघडचं, शिवाय तूर काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर केल्याने श्रम, पैसा, आणि वेळ वाचला. यांत्रिकीकरणामुळे पुढच पीक घेण्यासाठी लागलीच शेत तयार करण्याची सोय झाली.

- ॲड. पांडूरंग हारे, शेतकरी जवळगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com