‘एनडीडीबी’मुळे दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ : गडकरी

‘एनडीडीबी’मुळे दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ : गडकरी

नागपूर ः राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाने (एनडीडीबी) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सुगंधित दूध वितरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच स्वादात उपलब्ध असलेले सुगंधी दूध पिण्यास मिळणार आहे. सोबतच विदर्भातील दूध-उत्पादकांना एक बाजारपेठ मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी प्राथमिक शाळेमध्ये ‘एनडीडीबी’ फाउंडेशन फॉर न्युट्रिशनअंतर्गत दूध वितरणाच्या ‘गिफ्ट मिल्क’ या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नागो गाणार, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जि. प. अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार व ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष दिलीप रथ, प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात ३६ टक्के मुले ही कुपोषणग्रस्त आहेत. त्यांना दुधासारखा सकस व पौष्टिक आहार मिळाल्यास ते सुदृढ होतील. विदर्भाच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ‘एनडीडीबी’ मार्फत दूध संकलित करून ते मदर डेअ‍रीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले आहे. नागपूर शहरात दर दिवसाला मदर डेअ‍रीमधून ८ लक्ष रुपयाचे दूध व ८ लक्ष रुपयांचे इतर दुग्ध उत्पादने असे एकूण १६ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यामुळे दरवर्षी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. मदर डेअरीमुळे नागरिकांना दूध व शुद्ध दुग्ध उत्पादने स्वस्त दरात मिळण्याची सुविधा मिळत आहे. नागरिकांनी लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमप्रसंगी चहा किंवा शीतपेयाऐवजी सुगंधीत दूध जर पाहुण्यांना प्यायला दिले, तर त्यांनाही पौष्टिक आहार मिळेल व दुधाचा खप वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. बँक व इतर सार्वजनिक उद्योगांनीही पुढाकार घेऊन सी. एस. आर. अंतर्गत शाळांमध्ये दूध वितरणाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील महाजेनकोच्या पर्यावरण परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सी. एस. आर. अंतर्गत ‘गिफ्ट मिल्क’ हा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा या वेळी केली. नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमधील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांना या गिफ्ट मिल्क कार्यक्रमामुळे सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी जीवनसत्व ‘अ’ व ‘ड’  ने परिपूर्ण असलेले २०० मिली सुगंधित दूध मिळणार आहे. ‘एनडीडीबी’ फाउंडेशन फॉर न्युट्रिशनअंतर्गत यापूर्वीच गुजरात, झारखंड, तेलंगणा व तामिळनाडू येथील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या २२ हजार मुलांसाठी ‘गिफ़्ट मिल्क’ कार्यक्रम सुरू झाला असल्याची माहिती दिलीप रथ यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com