धन्य धन्य निवृत्ती देवा,  काय महिमा वर्णावा...

धन्य धन्य निवृत्ती देवा,  काय महिमा वर्णावा...
धन्य धन्य निवृत्ती देवा,  काय महिमा वर्णावा...

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी शुक्रवारी (ता.१२) लाखो भाविक सिंहस्थनगरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला दाखल झाले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, संतश्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी येथे भक्तांचा मेळा भरला आहे. सर्वत्र विठूरायाचा जयघोष सुरू आहे. हरिनामाच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे.

यात्रेसाठी भक्तांचा मेळा भरला एवढेच नव्हे, तर खास यात्रा बघण्यासाठी विदेशांतूनही पर्यटक आले आहेत. बारा वर्षांतून एकदा भरणारा सिंहस्थ कुंभमेळा व दरवर्षी भरणारा संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेचा हा ‘महाइव्हेंट’ पाहण्यासाठी व त्याचा अनुभव घेण्यासाठी परदेशी पाहुणे आता येऊ लागले आहेत. अशा या यात्रेसाठी परिवहन महामंडळाच्या बस गच्च भरून दाखल झाल्या.

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय.. निवृत्तिनाथ महाराज की जय..!

असा जयघोष करीत सकाळपासूनच बस, ट्रॅक्टर, ट्रक व पायी दिंड्यांमधून निवृत्तिनाथ महाराजांचा जय जयकार सुरू राहिला.

धन्य धन्य निवृत्ती देवा,  काय महिमा वर्णावा, शिवअवतार धरून, केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी

असा आदरयुक्त गौरव संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात केला आहे. दिंडी म्हणजे केवळ हौस नाही की मौज नाही, दिंडी म्हणजे साधना आहे. पायी दिंडीने शेकडो मैल चालणे तेव्हा तर धड रस्तेही नव्हते. दगडगोटे, खाचखळगे काटेकुटे यातून मार्ग काढीत त्र्यंबकला वारीसाठी यावे लागे. आता तर सर्व सोयी उपलब्ध झाल्या. त्यामुळे लाखो भाविक दरवर्षी पायी चालत त्र्यंबकेश्वरची वाट तुडवित यात्रेला येत असतात. सकळही तिर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना, म्हणूनच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्र निवडले. कारण त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र त्रिसंध्या क्षेत्र आहे.

संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस फोर्स तैनात केले आहे. त्यात नाशिकचे पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कालावधीत लावण्यात आला आहे. या बंदोबस्तात एक पोलिस उपअधीक्षक तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक, चोवीस पोलिस उपनिरीक्षक, १७३ पोलिस कॉन्स्टेबल, साठ महिला पोलिस कॉन्स्टेबल, तर एकावन्न वाहतूक शाखेचे कर्मचारी सज्ज आहेत.

परिवहन महामंडळाच्या वतीने जवळपास ३०० बसचे नियोजन केले आहे. याबरोबरच आवश्यकतेनुसार बस वाढविण्यासाठी विभाग नियंत्रक यामिनी जोशी प्रयत्नशील आहेत. याशिवाय गुरुवारपासून (ता.११) यात्रा बस स्थानक गावाबाहेरील जव्हार फाटा बस स्थानकावर कार्यरत आहेत. त्यामुळे तीन दिवस गावात बस येणार नसल्याचे स्थानक प्रमुख शरद झोले यांनी सांगितले.

वनवासी कल्याण आश्रम व ग्रामविकास मंच गिरणारे यांच्या वतीने स्वयंसेवकांचे एक पथक दाखल झाले असून, जिल्हा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली निर्मल वारी प्रकल्पात जनजागृती व प्रबोधन यात्रेत करीत आहेत. अशा अनेक सेवाभावी संस्थांनी निर्मल वारी यशस्वी करण्यासाठी पालिकेच्या निर्मल वारीमध्ये सहभाग नोंदविला आहे़, तसेच हरीत ग्रुप आदींसारख्या अनेक संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.

कृषी विभागाकडून उपयुक्त योजनांची माहिती संत निवृत्तिनाथ यात्रेत विशेषकरून वारकरी भाविकांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. यासाठी तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध उपयुक्त योजनांची माहिती छापलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. याबरोबरच राजिगरा लाडवांचेदेखील वाटप करण्यात आले. या उपक्रमात तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, विस्तार अधिकारी आदींनी सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com