साखर सहसंचालकाचे कामकाज पुन्हा विस्कळित

साखर सहसंचालकाचे कामकाज पुन्हा विस्कळित
साखर सहसंचालकाचे कामकाज पुन्हा विस्कळित

पुणे : राज्याच्या साखर आयुक्तालयातील उपपदार्थ सहसंचालक कार्यालयाचे कामकाज पुन्हा विस्कळित होण्याची शक्यता आहे. या विभागाला सातत्याने पूर्णवेळ सहसंचालक मिळत नसल्याने शासन याबाबत खरंच गंभीर आहे का, असा प्रश्‍न व्यक्त केला जात आहे .   साखर कारखान्यांनी आता उपपदार्थांवर भर द्यावा, असे केंद्र व राज्य सरकारकडून सतत सांगितले जात असते. राज्यात उपपदार्थ क्षेत्रात अनेक समस्या असतानाही काही कारखाने चांगली प्रगती करीत आहेत. उपपदार्थ क्षेत्रात काही नवे प्रकल्पदेखील येत आहेत. अर्थात, आधीच्या आणि येऊ घातलेल्या प्रकल्पांसमोर अनेक समस्या आहेत. त्यासाठी साखर आयुक्तालयात उपपदार्थ विभाग वेगळा स्थापन करण्यात आलेला आहे. या विभागाला सतत बहुतेक वेळा पालक नसल्याचे दिसून येते.  तत्कालीन सहसंचालक शरद जरे यांची बदली झाल्यानंतर अनेक महिने उपपदार्थ विभाग वाऱ्यावर होता. याच कालावधीत राज्यातील साखर कारखाने इथेनॉल; तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांबाबत विविध समस्या मांडत होते. मात्र, पूर्णवेळ सहसंचालक नसल्याने साखर आयुक्तालयाचा उपपदार्थ विभाग या समस्यांबाबत बघ्याची भूमिका घेत होता.  "सहसंचालक नसल्यामुळे कारखान्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने बी. जे. देशमुख यांची पूर्णवेळ नियुक्ती काही महिन्यांपूर्वी केली होती. उपपदार्थ विभागाची घडी बसविण्याच्या प्रयत्नात असताना आता पुन्हा श्री. देशमुख यांची बदली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपपदार्थ विभाग पुन्हा डळमळीत होईल, अशी माहिती साखर कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.  श्री. देशमुख यांची सचिव म्हणून बदली करताना साखर उपपदार्थ विभागाला नवा सहसंचालक देण्यात आलेला नाही. श्री. देशमुख यांना साखर आयुक्तालयातील उपपदार्थ विभागाचे अतिरिक्त काम बघण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे बाजार समितीवर लक्ष ठेवायचे की साखर कारखान्यांच्या उपपदार्थ क्षेत्राच्या समस्यांचा पाठपुरावा करायचा अशी कसरत श्री. देशमुख यांना करावी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. साखर आयुक्तालयात मुळात उपदार्थ सहसंचालक कार्यालय बळकट करण्याची आवश्यकता आहे. सहवीज विभाग आणि इथेनॉल-अल्कोहोल विभाग या दोन्ही क्षेत्रांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. "राज्याच्या साखर कारखान्यांची उपदार्थांमधील कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल, त्यातून शासनाला मिळणारा महसूल आणि उपपदार्थ क्षेत्रातील समस्यांचा विचार करता या विभागात तांत्रिकदृष्ट्या सक्षम असे किमान दोन-तीन अधिकारी नियुक्त करण्याची गरज आहे. मात्र, सहकार विभागाने आपल्या तात्पुरत्या सोयीसाठी उपदार्थ विभाग कायम कमकुवत ठेवला. “मोक्याची पोस्ट” मिळवण्यासाठी “तात्पुरता प्लॅटफॉर्म” म्हणून या पदाचा वापर केला जात आहे," अशी माहिती सूत्रांनी दिली.  ‘पुणे बाजार समितीच्या सचिवपदी माझी नियुक्ती माझ्या विनंतीनुसार झालेली नाही. ही बदली शासनाने केली असून साखर उपपदार्थ सहसंचालकपदाचे अतिरिक्त कामही मी सांभाळणार आहे. त्यात काही अडचण येईल असे वाटत नाही.’ - बी. जे. देशमुख, साखर सहसंचालक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com