अठरा शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंशच आढळले नाहीत

आमच्याकडे असलेल्या वैद्यकीय अहवालात मृत शेतकऱ्यांच्या रक्तात विषाचा अंश सापडला आहे. या विषयावर काही संस्था जे दावे करत आहेत, त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणे संयुक्तिक ठरणार नाही. - डॉ. राजेंद्र देशमुख , जिल्हाधिकारी, यवतमाळ
अठरा शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंशच आढळले नाहीत
अठरा शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंशच आढळले नाहीत

पुणे/नागपूर : यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी कांडात मृत्युमुखी पडलेल्या १८ शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचा अंशच सापडला नसल्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हिसेरा आणि रक्त तपासणीनंतर ही बाब उघड झाली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, या शेतकऱ्यांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले याविषयी गूढ निर्माण झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कापसावर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या २२ शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. त्यातील १८ शेतकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात त्यांच्या शरीरात विषाचा अंश सापडला नाही. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या माहितीला दुजोरा दिला. या शेतकऱ्यांचे रक्त तपासणीला पाठविण्यासाठी उशीर झाला असावा, किंवा डॉक्टरांनी चुकीचे औषध दिले असावे; त्यामुळे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) या अहवालाची दखल घेऊन सखोल चौकशी करेल, असे फुंडकर म्हणाले.

दरम्यान, यवतमाळ येथील शेतकऱ्यांचे मृत्यू कीटकनाशकाने झाल्याचा दावा अवैज्ञानिक असल्याचे क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय कृषी रसायन उद्योगाच्या शिखर समितीचे अध्यक्ष राजू श्रॉफ यांनी म्हटले आहे. यवतमाळ विषबाधा प्रकरणाच्या वैज्ञानिक आणि तटस्थ चौकशीसाठी `एसआयटी`मध्ये विषविज्ञान व औषधे विषयातील तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

`कीटकनाशकाचा काही भाग फवारणीदरम्यान त्वचेवर उडाला किंवा पडला तरी मृत्यू ओढावेल अशी स्थिती अजिबात नसते. कीटकनाशकाचे प्रमाण रक्‍तात किती पीपीएम (पार्टीकल्स पर मिलीअन) आहे यावरून कीटकनाशक मृत्यूला जबाबदार आहे किंवा नाही हे ठरवता येते. अमरावती येथील सरकारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४३ जणांच्या रक्‍त नमुन्यात अशा प्रकारचे कोणतेही प्रमाण आढळले नाही,``असा दावा श्रॉफ यांनी केला आहे. मृत्यू कशामुळे झाला? विषबाधा प्रकरणातील मृत्यूंवरून स्वतःची कातडी वाचविण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा उद्योग महसूल, कृषी, वैद्यकीय विभागाच्या यत्रणांनी सुरू केला आहे. या प्रकरणात सर्व स्तरावर सरकारी यंत्रणांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवायला मुद्दामहून उशीर केला गेला का, हा मुद्दाही आता चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांच्या रक्तात विषाचा अंश सापडला नसेल तर मग त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणात विविध शक्यतांचा गदारोळ उडवून मूळ मुद्यावरून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com