‘बलभद्र’, ‘पुसदकर’ची कसून चौकशी शक्य

बलभद्र’, ‘पुसदकर’ची कसून चौकशी शक्य
बलभद्र’, ‘पुसदकर’ची कसून चौकशी शक्य

पुणे : राज्यात बलभद्र नावाने आलेल्या कापूस वाणात केंद्र सरकारची मान्यता नसलेले जनुक आढळून आलेले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास आता ‘बलभद्र’ आणि ‘अमोल पुसदकर’च्या जबाबमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस खात्याच्या सूत्रांनी दिली. 

बलभद्र नावाच्या संकरित कापूस वाणाच्या तीन चाचण्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत घेण्यात आल्या होत्या. त्यात क्राय२एबी टेस्ट, क्राय२एसी टेस्ट आणि आरआरएफ टेस्ट अशा तीनही चाचण्या ‘पॉजिटिव्ह’ असल्याचा अहवाल संस्थेने दिला. या वाणात तणनाशक प्रतिरोधित जनुक आढळून आलेले आहे.  ‘‘केंद्र सरकारची मान्यता नसतानाही या जनुकाचा वापर आणि पुरवठा कोणी, कसा आणि कोणाला प्रथम केला याचा शोध घेण्याचे आवाहन आता शासनासमोर आहे. कृषी खात्याच्या अहवालानुसार विदर्भातील अमोल पुसदकर याने या अवैध जनुकाच्या बियाण्यांची हाताळणी केली आहे. त्यामुळे पुसदकरची कसून चौकशी करणे आमच्या तपासाचा पहिला भाग राहील,’’ असेही पोलिसांनी स्पष्ट केले.  कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात महाराष्ट्र कापूस कायदा २००९ मधील तरतुदीनुसार जनुक प्रत्यारोपित बियाण्याच्या विक्रीला परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी सध्या फक्त बीजी-१ आणि बीजी २ या वाणांनाच आहे. ही मान्यतादेखील केंद्र सरकारच्या मूळ मान्यता प्रमाणपत्राच्या आधारावर देण्यात आलेली आहे.  बलभद्र वाणात सापडलेल्या अवैध जनुक बियाण्यामुळे केंद्र सरकारच्या पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ मधील तरतुदींचा भंग करून संबंधित कंपनीने बियाणे विकलेले आहे. या बियाण्यातील जनुकात तणनाशक प्रतिबंधक क्षमता असून या जनुकाचा विकास, प्रत्यारोपण आणि अशा बियाण्यांचे उत्पादन ही प्रक्रिया अतिशय खर्चिक असतानाही सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून बियाण्यांची विक्री झाली आहे.  ‘‘बलभद्र वाणाप्रमाणेच जादू, एटीएम, अर्जुन आणि क्रिष्णागोल्ड अशा वाणांमध्येदेखील तणनाशक प्रतिरोधित जनुक आढळून आल्याचा अहवाल कृषी खात्याकडून पोलिसांना पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे या अवैध जनुक बियाण्याचा पुरवठा करणारी देशपातळीवरील एक मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com