...आता ‘ताटे’ हटाव मोहीम

कृषी विभाग
कृषी विभाग

पुणे : कृषी खात्यातील घोटाळेबहाद्दरांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या आणि जलयुक्त शिवार अभियानात आदर्श कामगिरी केलेले कृषी उपसंचालक शिवराज ताटे यांना हटविण्यासाठी कृषी खात्यातील लॉबीने जोरदार कंबर कसली आहे. ताटे यांच्या विविध अहवालांमुळे आतापर्यंत २१ अधिकारी निलंबित झाले असून, ३१ अधिकारी निलंबनाच्या वाटेवर आहेत.  

पोलिस संरक्षणात कृषी खात्याची कामे करणारा एकमेव अधिकारी म्हणून ताटे यांचा उल्लेख केला जात होता. त्यांना शासनाने दोन वर्षे पोलिस संरक्षण दिले होते. सूक्ष्म सिंचन योजनेतील विविध गैरव्यवहाराची बिळे बुजविण्यात ते यशस्वी झाले होते. यामुळे शासनाची १७ कोटी रुपयांची बचत झाली होती. गुंडांनी हडपलेली कृषी विभागाची जमीन पुन्हा ताब्यात घेत सातबारावर कृषी विभागाचे नाव लावण्याची कामगिरी श्री. ताटे यांनीच केली होती.  

''जलयुक्त शिवार योजनेत श्री. ताटे यांनी उत्कृष्ट कामे केलीत. याशिवाय राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि कृषी विस्तारामध्ये उत्तम कामे केल्याबद्दल त्यांना कृषी विभागानेच सन्मानित केलेले आहे. मात्र, प्रामाणिकपणा आड आल्यामुळे केंद्रेकर यांच्या पाठोपाठ ताटे यांनाही हटविण्याची मोहीम सुरू झाली.

दक्षता पथकातून त्यांना हटविल्यास घोटाळ्याच्या अनेक फायली बंद होऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाई टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची केवळ ११० दिवसांत बदली करण्यात आली आहे, अशी माहिती आस्थापना विभागाच्या सूत्रांनी दिली.

आस्थापना विभागातील नोंदीनुसार श्री. ताटे यांना दक्षता पथकाचे उपसंचालक म्हणून ३१ मे २०१७ रोजी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांनंतर निघालेल्या नव्या आदेशात श्री. ताटे यांना दक्षता पथकातून फलोत्पादन विभागात हलविण्यात आले. श्री. ताटे यांची कोणत्या निकषावर बदली करण्यात आली याविषयी आस्थापना विभागात माहिती नाही. तथापि, मॅट अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातून त्यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

मॅटने २८ सप्टेंबरला श्री. ताटे यांच्या बदलीला स्थगिती दिली असून, त्यांना मूळ पदावर एका आठवड्यात नियुक्त करावे, असेही आदेश मॅटने दिल्यामुळे घोटाळे बहाद्दरांची कोंडी झाली आहे. दरम्यान, आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या बदलीच्या विरोधात श्री. ताटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दाद मागितली आहे. सदर पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून कृषी सचिवांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

प्रामाणिक सेवेबद्दल न्याय मिळेल? ''मी कृषी विभागात प्रामाणिक सेवा करून आतापर्यंत १२५ कोटी रुपयांची बचत केली आहे. माझी बदली केल्यामुळे मला मानसिक धक्का बसला आहे. माझ्यावरील अन्याय दूर करावा, अशी विनंती श्री. ताटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ''पारदर्शक सरकार'' अशी प्रतिमा सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारकडून या प्रकरणात अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने घेतला जातो याकडे आता कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

दक्षता पथकाबाबत अशा घडताहेत घडामोडी

  • तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दक्षता पथकाला सक्षम केले होते. या पथकावर अनेक घोटाळ्यांचा तपास करण्याची जबाबदारीही सोपविली होती. त्यामुळे  स्वतः केंद्रेकर व दक्षता पथक कृषी खात्यातील सोनेरी टोळीचे ''टार्गेट'' बनले.
  • केंद्रेकर यांची अचानक बदली झाल्यानंतर दक्षता पथकाला खिळखिळे करणे सुरू झाले. पथकाचे प्रमुख रफिक नाईकवाडी यांचीही अलीकडेच बदली झाली. मात्र, या बदल्या आम्हीच करून घेतल्या, अशा भूमिका श्री. केंद्रेकर व श्री. नाईकवाडी यांनी घेतल्या. श्री. ताटे यांनी मात्र बदलीविरोधात बंडाचे निशाण रोवले आहे.
  • शिवराज ताटे हे आता केवळ मॅटचा पुढील आदेश येईपर्यंतच दक्षता पथकात असतील. कृषी विभागातील ‘सोनेरी टोळी’ला कसेही करून श्री. ताटे यांच्याकडून चौकशीचे हत्यार काढून घ्यायचे आहे. त्यांना हटविताच दक्षता पथकाचे रूप ''दात आणि नखे नसलेल्या वाघा''सारखे होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com