नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेपाचशेच्या जवळ 

नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेपाचशेच्या जवळ 
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेपाचशेच्या जवळ 

नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात टॅंकरची संख्या ५४५ झाली. जिल्ह्यातील ३८७ गावे व दोन हजार १३४ वाड्या-वस्त्यांवरील नऊ लाख दोन हजार ७७९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाचे तब्बल ५४५ टॅंकर सुरू केले आहेत. 

नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस टॅंकरची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, सध्या श्रीरामपूर वगळता अकोले, राहाता, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या तेरा तालुक्‍यांतील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. 

जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त टॅंकर हे पाथर्डी तालुक्‍यात सुरू आहेत. या तालुक्‍यात १३५ टॅंकर, तर सर्वांत कमी टॅंकर राहुरी, अकोले तालुक्‍यामध्ये प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे. मागील २००३ पासून यंदाच्या वर्षी जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील जलस्तर कमालीचा घटला. त्यामुळे प्रशासनावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ आली.

 टॅंकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर होते. परंतु आता ते उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या झळा जशा-जशा वाढतील, तशी टॅंकरची संख्या झपाट्याने वाढण्याची यंदा चिन्हे आहेत. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. टॅंकरची सर्वाधिक संख्या पारनेर, पाथर्डी, कर्जत तालुक्यांत आहे. 

तालुकानिहाय टॅंकर संख्या : संगमनेर - ४२, अकोले - १, कोपरगाव - ६, राहुरी - १, नेवासे - ३, राहाता - ३, नगर - ४४, पारनेर - ११९, पाथर्डी - १३५ शेवगाव - ४४, कर्जत - ७१, जामखेड - ४६, श्रीगोंदे - ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com