खानदेशात सूतगिरण्यांची वानवा

कापूस हे खानदेशचे प्रमुख पीक आहे. कापसाचा पुरवठा सर्वच तालुक्‍यांमधून होतो. जवळपास १५० जिनिंग कारखाने खानदेशात आहेत. पण सूतगिरण्या मात्र चारच आहेत. सूतगिरण्या वाढल्या तर रोजगार वाढेल, कापसाचे दर टिकून राहतील. - संजय चौधरी , शेतकरी, खेडी खुर्द, जि. जळगाव.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे. यंदा तर जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुके कापूस उत्पादक म्हणून शासनाने घोषित केले आहेत. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले. खानदेशात एकूण सात सूत गिरण्या असून, त्यापैकी चार सुरू असून, तीन बंद आहेत. बंदावस्थेतील सूतगिरण्या केव्हा सुरू होतील, हा प्रश्‍न आहे.

सद्यःस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील उंटावद-होळ येथे जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी उत्तमपणे काम करीत आहे. पंचतारांकित सूतगिरणी म्हणून या गिरणीने लौकिक मिळविला असून, पी. के. अण्णा पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र दीपकभाई पाटील हे या गिरणीसंबंधीचे कामकाज पाहत आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्‍यात प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी आमदार अमरिश पटेल यांच्या नियोजनानुसार काम करीत आहे. शिरपुरात टेक्‍सटाईल पार्कसंबंधीदेखील मध्यंतरी कार्यवाही झाली. काही खासगी वस्त्रोद्योगातील मंडळीने कापड मिल, क्‍लस्टर सुरू केले आहेत. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या दूरदृष्टीने मुक्ताईनगरनजीक संत मुक्ताई सूतगिरणी कार्यरत आहे. चोपडा तालुक्‍यात मजरेहोळनजीक माजी आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नाने सूतगिरणी सुरू झाली आहे. यानंतर नव्या सूतगिरणीचे काम कुठेही सुरू नाही.

खानदेशात दरवर्षी ऑक्‍टोबर ते मे दरम्यान २२ ते २५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) कापूस उत्पादन होते. परंतु यातील अधिकाधिक कापसाची खरेदी गुजरातमधील जिनर्स करतात. कारण, गुजरातमध्ये सूतगिरण्या वाढत आहेत. तेथे कापसाचे क्षेत्र कमी आहे, परंतु जवळपास १५४ सूतगिरण्या असल्याने कापसाची किंवा रुईची गरज अधिक आहे. खानदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस तेथे जात आहे. कारण खानदेशात प्रक्रिया करायला हवे तेवढे उद्योग नाहीत.

जळगाव जिल्ह्यात तीन सूतगिरण्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्यात खडका (ता. भुसावळ) येथील सहकारी सूतगिरणी, यावल येथील जे. टी. महाजन सूतगिरणी व नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील सहकारी सूतगिरणीचा समावेश आहे. नगरदेवळा व खडका गिरणीतील साहित्य, यंत्रणेची दुरवस्था झाली आहे. जे. टी. महाजन सूतगिरणी मध्यंतरी कापूस प्रक्रिया उद्योजकांना भाडेतत्त्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो अयशस्वी ठरला.

या तिन्ही गिरण्या बॅंकांचे कर्ज थकल्याने अवसायनात गेल्या आहेत. त्या सुरू करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने कापसाला हवे तसे दर जळगाव व धुळ्यात मिळत नाहीत. प्रत्येक तालुक्‍यात एक सूतगिरणी हवी आहे. कारण खानदेशात किमान साडेसात ते आठ लाख हेक्‍टरवर कापसाचे लागवड क्षेत्र असते. अलीकडे बागायती कापसाचे दर्जेदार व भरघोस उत्पादन शेतकरी ठिबक व इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने घेत आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com