परभणीत ई-नाम योजनेच्या अमंलबजावणीत अडथळे कायम

ई-नामअंतर्गत व्यवहारासाठी बाजार समिती, शेतकरी, अ़डते, खरेदीदार यांचे एकाच बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची खाती जिल्हा बॅंकेत आहेत. या बॅंकेची एटीएम सुविधा उपलब्ध करून द्यावी. ई-नामच्या निकषांची पूर्तता केली जात आहे. अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे खुलासा सादर केला आहे. - विलास मस्के, सचिव, बाजार समिती, परभणी.
परभणी बाजारसमिती
परभणी बाजारसमिती
परभणी ः ई-नाम कार्यप्रणालीनुसार आवश्यक निकषांची पूर्तता करण्याची प्रक्रिया परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अजूनही सुरूच आहे. ई-आॅक्शनसाठी शेतीमालाचे खरेदीदार, अडते मनोमन राजी नाहीत. कॅशलेस पेमेंटसाठी अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांचा कल अजूनही रोख व्यवहाराकडेच आहे. त्यामुळे ई-कार्यप्रणालीनुसार व्यवहार अद्याप सुरळीतपणे सुरू नाहीत. ई-नामच्या अमंलबजावणीबाबत उदासीनता दाखविल्यामुळे संचालक मंडळावर बरखास्तीचे गडांतर आले आहे.
 
गेल्या १३ महिन्यांमध्ये ई-आॅक्शन पद्धतीने २ लाख ७६ हजार ७१७ क्विंटल शेतीमालाची खरेदी झाली असून, १२ कोटी ३७ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. शेतीमालाच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी. शेतकऱ्यांच्या दर्जेदार शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार योजना (ई-नाम) राबविण्यात येत आहे.
 
या योजनेच्या कार्यप्रणालीनुसार गेट एंट्री, लाॅट मॅनेजमेंट, शेतीमालाची गुणवत्ता तपासणे, ई-आॅक्शन करणे, शेतीमालाचे वजन, सेल अॅग्रिमेंट, सेल बील, आॅनलाइन पेमेंट, जावक गेट एंट्री याप्रमाणे कामकाज करणे अपेक्षित आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्केट यार्ड बंदिस्त असणे आवश्यक आहेत. त्याला केवळ इन आणि आउट असे दोनच प्रवेशद्वारे असणे आवश्यक आहे. परंतु येथील बाजार समिती शहरामध्ये असल्यामुळे वाहनांना अनेक बाजूंनी प्रवेश करता येऊन बाहेर पडता येते. काही महिन्यांपूर्वी लोखंडी खांब लावून वाहनांचा प्रवेश बंद केला होता, परंतु हे खांब मोडून पडल्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाली आहे.
 
मुख्य प्रवेशद्वारावर वजनकाटा उभारणीचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. वायफाय सुविधा कार्यान्वित नसल्यामुळे व्यापाऱ्यांना ई-आॅक्शनसाठी अडचणी येत आहेत. बाजार समिती कार्यालयासमोरच भारतीय स्टेट बॅंकेची कृषी विकास शाखा, जिल्हा बॅंकेची शाखा आहे; परंतु त्यांचे एटीएम नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केलेली रक्कम उचलण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे रोखीने व्यवहार असलेल्या जिल्ह्यातील मानवत, बोरी आदी बाजार समित्यांमध्ये शेतीमाल नेला जात आहे.
 
विविध कारणे सांगत व्यापाऱ्यांनी खोडा घातल्यामुळे ई-आॅक्शन प्रक्रियेत अद्याप गती प्राप्त झालेली नाही. परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १२५ गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकऱ्यांनी सातबारा उतारे, आधार कार्ड, बॅंक खात्याचा तपशील आदी माहितीची ई-नामअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गावांमध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात आली. परंतु आजवर ८ हजार ४९ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे.
 
बाजार समितीअंतर्गत ९६ अडते आहेत. त्यापैकी ८१ अडत्यांनी, ३७७ खरेदीदार व्यापाऱ्यांपैकी १४१ व्यापाऱ्यांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली आहे.
ई-नाम कार्यप्रणालीसाठी निकषांची पूर्तता करण्याचे काम सुरूच आहे. परंतु ई-नामच्या अमंलबजाणीबाबत उदासीनता दाखविल्यामुळे पणन संचालकांनी बाजार समितीच्या संचालक मंडळास कारणे दाखवा नोटिसा बजावत संचालक मंडळ बरखास्त करण्याची तंबी दिली आहे. त्यानंतर अडचणींचा खुलासा जिल्हा उपनिबंधकाकडे सादर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com