पाणलोट गैरव्यवहारातील अधिकाऱ्याला चांगल्या पदाचे बक्षीस

पाणलोटची कामे
पाणलोटची कामे

पुणे : कृषी विभागात गैरव्यवहार केल्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी ‘जिल्हा कृषी विकास अधिकारी’ म्हणून पदाची बक्षिसी कोणी दिली याची जोरदार चर्चा कृषी आयुक्तालयात सुरू आहे. विशेष म्हणजे विषबाधा प्रकरणात याच अधिकाऱ्याला राज्य शासनाने निलंबित केले आहे.  राज्याचे प्रधान सचिव बिजयकुमार यांच्याकडे यवतमाळमधील पाणलोट कामांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या. कृषी मंत्रालयाने अखेर एक सप्टेंबर २०१७ रोजी यवतमाळमधील उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी सहा महिन्यांत पूर्ण केली जाणार होती.  पाणलोट गैरव्यवहाराबाबत श्री. कळसाईत यांच्यासह तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम एकनाथ अनगाईत, मंडळ कृषी अधिकारी कैलास किसन चव्हाण आणि कृषी पर्यवेक्षक सुनील भाऊराव महल्ले यांचीही चौकशी करावी, असे मंत्रालयाने नमूद केले आहे.  गैरव्यवहाराची चौकशी सुरू असताना श्री. कळसाईत यांच्या गळ्यात जिल्हा कृषी विकास अधिकारी पदाची माळ टाकण्यात आली. त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात अवैध बियाण्यांच्या विक्रीला ऊत आला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  ‘‘कीटकनाशकांच्या विक्री व वापराचे अहवाल श्री. कळसाईत यांनी व्यवस्थित ठेवलेले नाहीत. जिल्हा कृषी विकास अधिकारी म्हणून नियोजनात चुका केल्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या बचावासाठी कृषी खात्यामधील एक लॉबी सक्रिय आहे,’’ असे आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.  यवतमाळ जिल्ह्यात नाला खोलीकरणाची कामे करताना कृषी खात्यामधील भ्रष्ट साखळीने राज्य शासनाच्या नियमावलींचा उघडपणे भंग केला आहे. जिल्ह्यात अंदाजे पाच कोटी रुपयांची अनियमित कामे केल्याचा संशय आहे. सध्या किरकोळ चौकशी केल्यानंतरदेखील दोन लाखाच्या कामांवर सहा-सहा लाख रुपये खर्च दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सखोल चौकशी कशी टाळता येईल, यासाठी आयुक्तालयात लॉबिंग सुरू असल्याचे सांगितले जाते. गुन्हा दाखल नाही; चौकशीदेखील अर्धवट  अमरावती सहसंचालक कार्यालय तसेच पाणलोट संचालकांच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार दारव्हा विभागात नाला खोदाईचे दर हे मंजूर सूचीमधील तरतुदीपेक्षा जादा वापरले गेले आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. हा गैरव्यवहार खणून काढण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण कामांची चौकशीचे आव्हान कृषी खात्यासमोर उभे आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून सखोल चौकशीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com