वीज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार : नवले

गतवर्षी नोटाबंदीने खचलेला शेतकरी यंदा फसव्या कर्जमाफीनं नागवला गेला आहे. पाणी असूनही डीप्या उतरवण्याच्या तुघलकी कारभाराला कायदा तोडूनच उत्तर दिले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे षडयंत्र सरकारने रचले आहे. - रघुनाथदादा पाटील , शेतकरी संघटनेचे नेते
वीज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार : नवले
वीज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार : नवले

मुंबई : शेतकऱ्यांकडून वीजबिलाची बेकायदा, अन्यायी वसुली होत आहे. ती थांबवावी यासाठी बुधवार (ता. १) पासून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करणाऱ्या वीज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत, असा इशारा सुकाणू समितीचे महाराष्ट्रचे समन्वयक डाॅ. अजित नवले यांनी मंगळवारी (ता. ३१) दिला. शेतकरीहिताच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यभर जेल भरो आंदोलन सुरू केले जाईल, असेही सुकाणू समितीने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी येथे सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे समन्वयक नवले यांनी आंदोलनाची घोषणा केली. पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील, बाबा आढाव, डाॅ. अशोक ढवळे, डाॅ. अजित नवले, संजय पाटील घाटगेकर, प्रतिभा शिंदे, किशोर ढमाले यांच्यासह सुकाणूचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवले म्हणाले, की कर्जमाफीसाठी राज्यभरातील ९८ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ५५ लाख शेतकऱ्यांचेच ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. लावलेल्या अटी शर्तींमुळे, किचकट प्रक्रियेमुळे व आधार कार्डसारखी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने राज्यभरातील ४३ लाख शेतकरी अर्जच करू शकलेले नाहीत, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच सोयाबीनचे भाव कोसळल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारच्या धोरणांमुळे कापूस, कांदा, मूग व उडदाचे भावही सातत्याने पडत आहेत. योग्य खबरदारी न घेतल्यास दोन महिन्यात बाजारात येऊ घातलेल्या तुरीचा प्रश्नही जटील होणार हे उघड आहे.

आठ नोव्हेंबरला सरकारचे वर्षश्राद्ध आठ नोव्हेंबर रोजी सरकारचे वर्षश्राद्ध घालण्याचा कार्यक्रम घेत नोटाबंदीचे सर्वाधिक बळी ठरलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने संताप व्यक्त केला जाणार आहे. संपूर्ण कर्जमुक्ती आणि रास्त भावाच्या हमीसह इतर मागण्यांसाठी १० नोव्हेबर रोजी सरकारी कार्यालयात सोयाबीन, दूध, आणि शेतमाल ओतून घंटानादाचे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांची सुकाणू समिती, महाराष्ट्रचे समन्वयक डाॅ. अजित नवले यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या

  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा. कर्जमाफीत पीक कर्जासह शेडनेट पॉलिहाउस जमीन सुधारणा इत्यादीसाठी घेतलेल्या सर्व कर्जाचा समावेश करा.
  • शेतीमालाला रास्त भाव द्या. सोयाबीन, कापूस, मूग, उडदाची पुरेशा प्रमाणात रास्त भावाने सरकारी खरेदी करा. खाद्यतेलावर आयात शुल्क लावा, सोयामिल निर्यातीला अनुदान द्या, सोयाबीन, कापूस, मूग व उडीद हमीभावाने खरेदी करणारी पुरेशी केंद्रे तातडीने सुरू करा, कांदा व्यापार प्रभावित करण्यासाठी धाडी टाकण्याचे, कांदा आयात करण्याचे व इतर उपाय करून कांद्याचे भाव पाडण्याचे षड्‍यंत्र थांबवा. सोयातेलावर आज असलेल्या १७.५ टक्के आयातशुल्कात १० टक्के वाढ करा. क्रूड पामतेलावर आज १५.५ टक्के तर रिफाइंड पामतेलावर २५.५ टक्के आयात शुल्क आहे. या दोन्ही प्रकारच्या तेलांवर आयात शुल्कात आणखी प्रत्येकी २० टक्के वाढ करा.
  • उत्पादन खर्च पाहाता उसाला किमान ३५०० रुपये प्रतिटन भाव देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत. सरकार मात्र परिस्थिती चिघळण्याची वाट पाहत बघ्याची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता सरकारने तातडीने जबाबदारी घेत उसाला ३५०० रुपये प्रतिटन भाव द्या.
  • वीज कंपनीची पठाणी वीजबिल वसुली थांबवा. शेतकऱ्यांची वीजबिले माफ करा.
  • शेतकरी संपाचे वेळी दिलेले आश्वासन पाळत दूध व्यवसायाला ७०x३० चे सूत्र लागू करा व दूध खरेदी दरात वाढ करून गायीच्या दुधाला किमान ५५ रुपये व म्हशीच्या दुधाला ६५ रुपये प्रतिलिटर भाव द्या.
  • कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या व बाधित असलेल्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी किमान १० लाख रुपये भरपाई द्या. भविष्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बळी जाणार नाहीत यासाठी कठोर उपाययोजना करा.
  • दिलेले आश्वासन पाळत शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवरील केसेस मागे घ्या.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com