पुणे विभागात तेलबिया पिकांची १ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः दिवसेंदिवसे खाद्यतेलास मागणी वाढत आहे. त्यामुळे तेलबिया पिकांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पुणे विभागात तेलबिया पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार ५२० हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात एक लाख ७० हजार ३६० हेक्टरवर म्हणजेच १२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून खाद्यतेलास ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल आणि सोयाबीन अशा पिकांपासून खाद्यतेलनिर्मिती होऊन त्याची विक्री केली जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या शेतीमालासाठी चांगला दर मिळतो. मात्र, मागील पाच ते सहा वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी पीक बदल करत आहे. त्यातच तेलबिया पिकांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन, भुईमूग ही पिके घेण्याकडे कल वाढत आहे.

यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सर्वाधिक पेरणी केली आहे. पुणे विभागात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र ६८ हजार ९३० हेक्टर क्षेत्र आहे. त्या तुलनेत एक लाख ३६ हजार ३२० हेक्टर म्हणजेच १९७ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र ५८ हजार २८० हेक्टर असून, त्या तुलनेत ७८ हजार ४४० हेक्टरवर म्हणजेच १३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, नगर, पारनेर, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यांत सोयाबीन पेरणीचे प्रमाण अधिक आहे.

पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र ५२०० हेक्टर असून, त्यातुलनेत १८ हजार ७८९ हेक्टरवर म्हणजेच ३६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी ३९ हजार ९० हेक्टर असून, त्यातुलनेत ७१ हजार ७१० हेक्टरवर पेरणी झाली आहे.    

पुणे विभागात तेलबिया पिकांची झालेली पेरणी (हेक्टर)
पीक  सरासरी क्षेत्र झालेली पेरणी  टक्केवारी
भूईमूग ४७,८४० २४,३२० ५०
तीळ   २,५८० ५३० २०
कारळे ६१८० ११८० १९
सूर्यफूल ९१९० ४६४० ५०
सोयाबीन ६८,९३० १,३६,३२० १९७
इतर तेलाबिया ५८१० ३३७० ५७
एकूण १,४०,५२० १,७०,३६० १२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com