मदर डेअरीकडून जुन्या दरानेच दूध खरेदी

मदर डेअरी
मदर डेअरी

बुलडाणा ः शासनाने आदेश दिल्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक अाॅगस्टपासून राज्यात होत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीकडून जुनेच दर मिळत असल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले अाहे. मदर डेअरीकडून बुलडाणा जिल्ह्यात १२ हजार लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होत अाहे. जिल्ह्यात मोताळा, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये ‘मदर’ डेअरीचे अधिक संकलन अाहे. डेअरीकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे दिले जातात. शासनाने नुकतीच दूध दरवाढ केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. मात्र मदर डेअरीकडून अद्याप या दरवाढीची अंमलबजावणी केली जात नसल्याने दूध उत्पादक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अाहेत. या जिल्ह्यात इतर डेअरींकडूनही हजारो लिटर दूध खरेदी केले जाते; मात्र त्यांच्याकडून अाधीच चांगले दर दिले जात अाहेत. केवळ मदर डेअरीचा दर हा फॅट ३.५ व ८.४ एसएनएफसाठी २१ रुपये ७० पैसे इतका दिला जात आहे. परिणामी हजारो दूध उत्पादक शेतकरी शासनाने केलेल्या भाववाढीपासून दूरच असल्याची बाबही या निमित्ताने पुढे अाली अाहे.    दूध उत्पादन करणे कठीण झाल्याने शासनाने दरवाढ करावी, अशी मागणी उत्पादकांमधून सातत्याने होत होती. त्याला न्याय मिळाला असून, पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ जाहीर झाले अाहेत. हे दर जाहीर करीत अंमलबजावणीचे अादेश देण्यात अाले.

पत्राची प्रतीक्षा मदर डेअरीकडून सुधारित दर न देण्याबाबत चौकशी केली असता, अद्याप अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात अाले. शासनाने दरवाढ देण्याबाबत जो अादेश दिला, त्यात काही अटी असून, त्यांची तपासणी करून नंतरच त्याबाबत दरवाढीचा निर्णय डेअरीच्या वरिष्ठ स्तरावरून घेतला जाईल, असे सांगण्यात अाले. या डेअरीचे दर हे वरिष्ठ पातळीवर ठरविले जातात. स्थानिक स्तरावर काम करणाऱ्यांना त्याबाबत कुठहीली अधिकृत माहिती देता येत नाही, असेही संबंधितांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com