`एक शेतकरी-एक ट्रान्सफॉर्मर` योजना १५ ऑगस्टपासून सुरू होणार : ऊर्जामंत्री

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर   : एक शेतकरी - एक ट्रान्सफॉर्मर या सुमारे ५००० कोटींच्या एचव्हीडीएस योजनेचे उद्‍घाटन येत्या १५ ऑगस्टला होणार असून, २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना या योजनेतूनच वीजजोडणी मिळणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या योजनेतून देण्यात येणाऱ्या कनेक्शनमुळे शेतकऱ्यांना अखंडित आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता येणार आहे. तसेच वीजचोरीवर या योजनेमुळे आळा बसेल. मुंब्रा, मालेगाव व अकोला येथे वीज वितरणाचे कंत्राट खासगी वितरण कंपनीला देण्यात येणार आहे. कारण या तीनही ठिकाणी ५० टक्के वीज हानी सध्या असून, ती १५ टक्क्यांवर आणण्यासाठी फ्रँचाईजी नेमण्यात येणार असल्याचेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांत ८९ गावांमध्ये एलईडी दिवे व ऊर्जासंवर्धन पथदर्शी प्रकल्पासाठी ५३.२५ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागण्या विधानसभेत मांडल्या. या पथदर्शी प्रकल्पात नागपूर जिल्ह्यातील ३१ गावे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ५८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा पथदर्शी प्रकल्प महाऊर्जामार्फत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २ एप्रिलला  झालेल्या बैठकीत निधीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार ही पुरवणी मागणी सादर करण्यात आली.

एलईडी दिव्यांचा व ऊर्जासंवर्धनाचा हा प्रकल्प पथदर्शी स्वरूपात दोन जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून, या योजनेचा फायदा लक्षात घेता संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचा शासनाचा विचार आहे. या प्रकल्पांतर्गत ८९ गावांमध्ये सीएफएल लाइट, वीज उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाइट बदलविण्यात येतील. ८९ गावांमध्ये विशिष्ट ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात येतील. या गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी भूमिगत वायरिंग करण्यात येईल. या प्रकल्पात ५ वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च अंतर्भूत आहे. ऊर्जा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर आमदार भास्कर जाधव, सुनील केदार, चरण वाघमारे, डॉ. मुंदडा, छगन भुजबळ आदींनी ऊर्जा विभागाबाबत आपल्या मागण्या सभागृहात मांडल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com