खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूच

खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूच

जळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा लागवड सुरू आहे. दर्जेदार कांदा रोपांसाठी शेतकरी एरंडोल व धरणगावसह अडावद (ता. चोपडा, जि. जळगाव) भागाला पसंती देत आहेत. कांदा रोपांच्या वाफ्यांचे दर स्थिर आहेत. यंदा लागवडीच्या क्षेत्रात काहीशी वाढ होऊ शकते, असे चित्र आहे.

धुळे जिल्ह्यात कांदा उत्पादनासाठी कापडणे, न्याहळोद ही गावे प्रसिद्ध आहेत. न्याहळोद व कापडणे येथील कांदा इंदूरातील अडतदार मागवून घेतात. तर नेर, कुसुंबा, जापी आदी भागातही कांदा  असतो. तर साक्री तालुक्‍यात पिंपळनेर भागात कांदा अधिक आहे. यासोबत  शिरपूर तालुक्‍यातील तरडी, बभळाज, होळनांथे, भवरखेडा, अर्थे, तऱ्हाडी आदी भागातही यंदा उन्हाळ कांद्याची बऱ्यापैकी लागवड झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात एरंडोल, धरणगावसह जळगाव, यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर तालुक्‍यात कमी अधिक लागवड आहे. यावल तालुक्‍यातील किनगाव, डांभुर्णी, साकळी भागात चांगली लागवड आहे. तर चोपडा तालुक्‍यातील मंगरूळ, माचले, खर्डी, लोणी, आडगाव, अडावद, धानोरा अशा सातपुडा लगतच्या अनेक गावांमध्ये लागवड झाली आहे.

यंदा वाफ्यांचे दर ५०० ते ६०० रुपये आहे. सुमारे पाऊण फुटाच्या बारीक रोपाची मागणी आहे. एरंडोलमधील आडगाव, उत्राण, तळई आदी भागात चांगली रोपे आहेत. तर धरणगाव तालुक्‍यातील पथराड, धार, लाडली भागातही रोपे मिळत असल्याची माहिती मिळाली. कांदा रोपाचे एक वाफे सुमारे एक बाय १० फूट व आठ बाय चार फूट आकाराचे असते. काही शेतकऱ्यांनी २० बाय दीड फुटाचे वाफे ठेवले असून, ते १२०० ते १३०० रुपये दर घेत आहेत. बागलाण (जि. नाशिक) पट्‌ट्यातही दर्जेदार कांदा रोपे मिळत असल्याचे सांगण्यात आले. धुळे, साक्री भागातील शेतकरी बागलाण पट्ट्यातून रोपे आणत असून, लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहील, असे सांगण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून एक एकर, अर्धा एकरवर कांद्याची लागवड केली आहे. तापी व गिरणा काठावर कांदा लागवड सुरू असल्याने यंदा क्षेत्र काहीसे वाढू शकते. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्‍टरवर उन्हाळ कांदा आहे. लागवड सुरूच असल्याने लागवड क्षेत्राचा आकडा आणखी वाढणार आहे. धुळ्यातही दोन हजार हेक्‍टरपर्यंत कांदा लागवड क्षेत्र असणार आहे, असे सांगण्यात आले.

यंदा कापसाचे पीक बोंड अळीमुळे पुरते हातचे गेले. अशात कमी पाणी असतानाही ठिबक, मल्चिंगचा वापर करून आमच्या भागात शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. काही भागात लागवड अजूनही सुरूच आहे. बागलाण भागातून अनेक जण कांदा रोपे आणतात. - आत्माराम बळिराम पाटील, शेतकरी, कापडणे (जि. धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com