कांदा बाजार संतुलित राहणार

कांदा बाजार संतुलित राहणार
कांदा बाजार संतुलित राहणार

चालू आठवड्यात तुरळक प्रमाणात उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली असून, मे अखेरपर्यंत ती टप्प्याटप्प्याने सुरू राहील. सध्या टिकवण क्षमता नसलेला रांगडा कांदाही बाजारात येतोय. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात नरमाई सुरू झाली. मार्चच्या पहिल्या पंधरवड्याअखेरपर्यंत रांगडा माल संपून जाईल. पुढे फक्त उन्हाळ माल बाजारात असेल. हा कांदा साठवता येत असल्यामुळे पुढचे मार्केट शेतकऱ्यांच्या हातात राहील.  जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात तिन्ही हंगामातील कांद्याचा सरासरी दर हा उत्पादन खर्चापेक्षा जास्त होता. थोडक्यात आठ महिने तेजीत गेले. आता मार्च ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कांद्याचा पुरवठा आणि बाजारभाव काय राहतील हा कळीचा मुद्दा आहे. ऑक्टोबरपासून नवा हंगाम सुरू होईल. त्या आधीच्या सात महिन्यात म्हणजे मार्च ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ८४ लाख टन माल देशांतर्गत गरजेसाठी तर २१ लाख टन निर्यातीसाठी अशा १०५ टन मालाचा खप अपेक्षित आहे. सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उन्हाळ कांद्याखालचे क्षेत्र सरासरी १६ टक्क्यांनी वाढले. उर्वरित राज्यांतील सरकारी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढलेले नाही, असे बियाणे कंपन्यांतील सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात क्षेत्र वाढले असले तरी प्रतिएकरी उत्पादन घटेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत एकूण पुरवठा संतुलित राहील. मार्च ते सप्टेंबर या सात महिन्यांतील सरासरी विक्री दर ८०० ते १००० रु. प्रतिक्विंटलच्या वर राहण्याची अपेक्षा आहे. पुढे खरिपातील कांद्याचे उत्पादन वाढले तर १५ सप्टेंबरपासून पुढे बाजारात नरमाई येऊ शकते. खरिपाचे उत्पादन हे सर्वस्वी पाऊसमान, लागवड क्षेत्रातील वाढ - घट यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी खरीप उत्पादन घटल्यामुळेच स्टॉकमधील मालास आणि पुढे नव्या मालास चांगला दर मिळाला होता हेही लक्षात घेतले पाहिजे. ऑक्टोबरपासून पुढे खरीप माल सुरू होतो. खरीप माल नेमका किती राहील, यावर ऑक्टोबरपासून पुढे बाजाराची चाल अवलंबून राहील. म्हणूनच सप्टेंबरअखेरपर्यंतच्या बाजाराबाबत बोलणे सयुक्तिक ठरते. गेल्या वर्षी खरीप माल मोठ्या तेजीत निघाल्यामुळे या वर्षी त्याखालील लागवड क्षेत्र वाढेल, असे बियाणे कंपन्यांचे निरीक्षण आहे. कारण खरीप बियाण्यांसाठी विक्रमी बुकिंग सुरू असल्याचे समजते. यंदाच्या उन्हाळ हंगामासाठी पुढील निरीक्षणे उपयुक्त ठरू शकतात. १. या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेला माल मेमध्ये बाजारात येईल. हा माल भर उन्हाळ्यात येणारा असेल, म्हणून त्याची टिकवणक्षमता फारशी चांगली राहणार नाही. २. डिसेंबरमधील लागवडीचे प्रमाण सर्वाधिक असून, या मालासही उन्हाचा फटका बसू शकतो. ३. उन्हाचा फटका बसलेला, कमी टिकवण क्षमतेचा आणि कच्चा माल किती पिकतो, यावर एप्रिल-मेमधील बाजार अवलंबून राहील. कांदा निर्यातीवरील निर्बंध हटले म्हणजे तेजीच राहील, असे नाही. देशांतर्गत मागणीपेक्षा उत्पादन जास्त असते तेव्हा निर्यातीमुळे खोलवर मंदीचा पाया ढासळतो, बाजाराला आधार मिळतो, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. दरमहा जेवढी आवक होते, त्याच्या सुमारे २० टक्केच माल निर्यात होतो. निर्यात होण्यालाही एक मर्यादा आहे. उदा. जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यांत आजवरची विक्रमी निर्यात झाली; पण या काळात ६०० ते ७०० रु. प्रतिक्विंटल दर मिळाले. म्हणजे बाजार मंदीत होता. मात्र, जर निर्यात सुरू नसती तर ३०० ते ४०० रु. ने माल विकावा लागला असता, इतकाच यातून बोध घेता येतो. तेजी, मंदी आणि संतुलित असे तीन प्रकारचे कल कोणत्याही शेतमालात असतात. कांद्याच्या संदर्भात १२० क्विंटल एकरी उत्पादनानुसार ८०० रु. प्रतिक्विंटलच्या खाली मंदी, ८०० ते १२०० संतुलित आणि १२०० च्या पुढे तेजी अशी वर्गवारी करता येईल. त्या अनुषंगाने सप्टेंबर २०१८ अखेरपर्यंत बाजार संतुलित राहण्याची अपेक्षा आहे. आजही उन्हाळ कांद्याला १००० रु. दर मिळत असेल तर एकरी १२० क्विंटलप्रमाणे १ लाख २० हजाराची विक्री होतेय. त्यातून ४० ते ६० हजारांपर्यंतचा नफा आपापल्या गावातील मजुरीचे दर, महागाई याप्रमाणे निघू शकतो. कांद्यातील नवख्या शेतकऱ्यांसाठी सरासरी विक्री दर म्हणजे काय हे सांगणे उचित ठरेल. नाशिक जिल्ह्यातील पारंपरिक कांदा उत्पादन घेणारा शेतकरी तात्पुरती तेजी-मंदी महत्त्वाची मानत नाही, हंगामाच्या सरासरीला महत्त्व देतो. उदा. एप्रिल महिन्यात जर एखाद्या शेतकऱ्याने दोन एकरात २५० क्विंटल मालाचे उत्पादन घेतले आणि त्यावेळी बाजारभाव जर उत्पादन खर्चापेक्षा बरा असेल तर १५ ते २० टक्के मालाची विक्री होते आणि उर्वरित माल चाळीत साठवला जातो. चाळीत साठवलेला माल एकाएकी बाजारात येत नाही. जून ते सप्टेंबर या ऑफ सिझनमध्ये चार-पाच टप्प्यांत माल विक्री होते. अशाप्रकारे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील सरासरी दर त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. कांदा बाजाराचा नेमका कल काय राहील, आपली आर्थिक निकड काय आहे, आपला माल किती दिवस टिकू शकेल, यानुसार विक्रीचे निर्णय घेतले तर ते सहसा चुकत नाहीत.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com