Onion Market Rate : राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल

राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल

नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल

नाशिक : नाशिक बाजार समितीत बुधवारी (ता. २३) कांद्याची ४५०० क्विंटलची आवक झाली. याच वेळी जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत ८२०० क्विंटलची आवक झाली. तर लासलगाव बाजार समितीत ८४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या या प्रमुख बाजार समित्यांसह एकूण १५ बाजार समित्यांत कांद्याची आवक होते. या बाजार समित्यात बुधवारी कांद्याला प्रतिक्विंटलला ३०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाले. 

नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांत व ४५ उपबाजारांमध्ये कांद्याची आवक होते. सद्यस्थितीत कांद्याची आवक घटलेली आहे. स्थानिक तसेच परराज्यातील बाजारपेठेतून होणारी मागणीही स्थिर आहे. ही परिस्थिती मागील १ महिन्यांपासून कायम आहे.

चाळीत साठवला जाणारा उन्हाळ कांदा आता बाजारात येत आहे. यातील बहुतांश कांदा साठवला जात असल्याने बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक कमी आहे. मागील दोन आठवड्यात कांद्याच्या सरासरी दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळात कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

Onion Market Rate
Onion Market Rate Agrowon

अकोल्यात ३०० ते ७०० रुपये क्विंटल

अकोला : येथील बाजारात उच्चप्रतीचा कांदा सातशे रुपयांपर्यंत क्विंटलला विकत आहे. कमीत कमी तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कमी झाले आहेत. बाजारात सरासरी ४०० रुपयांचा दर शेतकऱ्यांच्या हातात पडत आहे. स्थानिक कांद्याची आवक वाढल्याने दर कमी मिळत आहेत. सध्या बाजारात दिवसाला किमान पाचशे ते सहाशे क्विंटल कांद्याची आवक होत आहे.

सध्या कांद्याची मागणीसुद्धा असल्याने दररोज ही विक्री होत आहे. अकोला जिल्ह्यात कांद्याची लागवड बऱ्यापैकी असते. हंगामाच्या तोंडावर शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करीत आहेत. यामुळे आवकेत सतत वाढ होत आहे. कांद्याची आवक वाढत असल्याचा परिणाम दरांवर झाला. उच्च प्रतीच्या कांद्याला ५०० ते ७०० दरम्यान आणि दुय्यम प्रतीला ३०० ते ४५० पर्यंत दर मिळत आहे. किरकोळ बाजारात कांदा १० ते १५ रुपये किलोने ग्राहकांना विकल्या जात आहे. आणखी महिनाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. क्षमता असलेल्यांनी साठवणूक केली तर आगामी काळात वाढणाऱ्या दरांचा फायदा मिळू शकतो, असेही सूत्रांचे म्हणणे होते.

औरंगाबादेत १०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २४) कांद्याची ७२५ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला १०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कांद्याच्या आवक आणि दरामध्ये गत काही आठवड्यात कायम चढउतार राहिला आहे. २ एप्रिलला औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. २४ एप्रिलला ४०५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २०० ते ५५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २ मे ला ५७१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

१० मे ला कांद्याची आवक ६४६ क्‍विंटल तर दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ मे ला ७३६ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१ मे ला कांद्याची आवक ६०७ क्‍विंटल तर दर १०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोल्हापुरात ५० ते १०० रुपये दहा किलो कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्याची दररोज पंधरा ते सोळा हजार पोत्यांची आवक झाली. कांद्यास दहा किलोस ५० ते १०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याचे दर अपवाद वगळता स्थिर असल्याची माहिती कांदा, बटाटा विभागातून देण्यात आली. येथील बाजार समितीत कांद्याची आवक नगर जिल्ह्याबरोबर बाहेरील राज्यातूनही होत आहे. सध्या दोन्हीकडून थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. पंधरवड्यापूर्वी कांद्यास दहा किलोस ९० रुपयांपर्यंत दर मिळत होता. सध्या दहा किलोचा कमाल दर १०० रुपये इतका आहे. कांद्यास दररोज दहा किलोस ७० रुपये इतका सरासरी दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या आवकेत फारशी वाढ झाली नाही. १७ मे रोजी कांद्याची पंधरा हजार पोत्यांची आवक होती. गेल्या सप्ताहात किमान दर ३० रुपये इतका होता. त्यात थोडी वाढ होऊन किमान दर ५० रुपये दहा किलो इतका झाल्याचे कांदा बटाटा विभागातून सांगण्यात आले.

नगरला १०० ते ८२५ रुपये प्रतिक्विंटल :

नगर ः नगर बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांचा विचार करता कांद्याची आवक कमी झाली आहे. दर नसल्यामुळे आवक कमी झाल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीत गुरुवारी (ता. २४) झालेल्या लिलावात कांद्याला शंभर रुपयांपासून ९०० रुपयांचा व सरासरी ६०० रुपयांचा दर मिळाला. मागील आठवडाभराच्या तुलनेत दर स्थिर आहे. नगर बाजार समितीत नगर जिल्ह्यामधील सर्व बाजार समित्यांपेक्षा जास्ती कांद्याची आवक होत असते. येथे सोमवारी, गुरुवारी व शनिवारी असे तीन दिवस लिलाव होतात. गेल्या महिनाभरापासून येथे कांद्याला सरासरी दोनशे रुपयांपासून साडेआठशे रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

सोमवारी (ता. २१) झालेल्या लिलावात मात्र दोनशे रुपयांनी कांद्याचे दर कमी झाले. त्या दिवशी ६१ हजार १४७ गोण्यांची आवक झाली आणि १०० रुपयांपासून ८२५ रुपयांचा दर मिळाला. त्याआधी शनिवारी (ता. १९) ७५ हजार २५६ कांदा गोण्याची आवक झाली होती. त्या दिवशीही शंभर रुपयांपासून ८२५ रुपयांचा व सरासरी ५५० रुपयांचा दर होता. मागील गुरुवारी (ता. १७) शंभर रुपयांपासून ९०० रुपयांचा व सरासरी ६०० रुपयांचा दर होता. त्या दिवशी ८३ हजार ६६५ गोण्यांची आवक झाली होती. जिल्ह्यामधील अन्य पारनेर, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे बाजार समितीतही कांद्याची आवक कमी झालेली असून, शंभर रुपयांपासून ८०० रुपयांचा दर मिळत आहेत.

परभणीत प्रतिक्विंटल २०० ते २५० रुपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये आठवड्यातील दर मंगळवारी आणि शनिवारी २०० ते २५० क्विंटल कांद्याची आवक होत आहे. प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते  ५०० रुपये दर मिळत आहेत. येथील  फळे-भाजीपाला मार्केटमध्ये आठवड्यातील दर मंगळवारी आणि शनिवारी कांदा आवक होते. सध्या स्थानिक परिसरातून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. मंगळवारी (ता. २२) २५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २४) घाऊक विक्री ३०० ते ५०० रुपये दराने तर किरकोळ विक्री ५ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती. असे व्यापारी स. जावेद यांनी सांगितले.

नागपूर बाजारात आवक वाढली

नागपूर : कांद्याची आवक वाढण्यासोबतच दर कमी झाले अाहेत. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदील झाले आहेत. कळमणा बाजार समितीत लाल कांद्याची आवक एक हजार क्‍विंटलवरून २००० क्‍विंटलवर पोचली आहे. पांढऱ्या कांद्याच्या आवकेतदेखील वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.  नागपूरच्या कळमणा बाजार समितीत एप्रिल महिन्याच्या सुरवातीला लाल कांदा आवक सरासरी १००० ते १२०० क्‍विंटलची होती. ८०० ते १००० रुपये क्‍विंटलचा दर लाल कांद्याला मिळत होता. पांढऱ्या कांद्याची आवकदेखील ९०० ते १००० क्‍विंटलच्या घरात होती. ७०० ते ९०० रुपये क्‍विंटलने पांढऱ्या कांद्याचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले.

२५ एप्रिलपासून लाल कांद्याच्या दरात सतत कमी होत असल्याचे नोंदविण्यात आली. ७०० ते ९०० रुपये क्‍विंटलचा दर लाल कांद्याचा होता तर पांढरा कांदा ६०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आला. लाल कांद्याचे दर आजच्या घडीला ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलवर पोचले असून पांढऱ्या कांद्याचे व्यवहार ५०० ते ७०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. पांढऱ्या कांद्याची आवक ३००० क्‍विंटलवर पोचली असून लाल कांद्याची आवक २००० क्‍विंटलची असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी सांगितले.

जळगावात २२५ ते ६२५ रुपये प्रतिक्विंटलचे दर

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक या आठवड्यात वाढली. मागील पंधरवड्यात प्रतिदिन ८५० क्विंटलपर्यंत आवक होती. ही आवक मागील दोन-तीन दिवसांत वाढली. मंगळवारी (ता. २२) ११०० क्विंटल आवक झाली. तर गुरुवारी (ता. २४) १५०० क्विंटल आवक झाली. परंतु, गुरुवारी दर स्थिर होते. आवक सध्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्‍यासह साक्री, पिंपळनेर, फागणे, औरंगाबादमधील कन्नड, जामनेर भागातून होत आहे. यावल, चोपडामधून कुठलीही आवक नाही. कारण, या भागातील कांदा अडावद व इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात जात असल्याचे सांगण्यात आले.

कांद्याच्या कमाल दरात काहीशी सुधारणा झाली आहे. मध्यंतरी कमाल दर हे ५२५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. परंतु त्यात सुधारणा झाली असून, दर स्थिर आहेत. मागील महिनाभरात कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ६२५ रुपये दर मिळाला आहे. तर किमान दर २२५ रुपयांपर्यंतच आहेत. आवक कमी अधिक झाली. सध्या अनेक भागांत कांदा काढणी होऊन तो बाजारात आणला जात आहे, अशी माहिती मिळाली. 

Onion Market Rate
Onion Market Rateagrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com