राज्यात कांदा प्रतिक्विंटल ४०० ते ५२०० रुपये

लासलगावसह इतरही बाजार समित्यांतील कांद्याची आवक व दराची स्थिती जवळपास सारखीच आहे. उन्हाळ कांदा संपण्याच्या मार्गावर आहे. जास्तीत जास्त १५ डिसेंबरपर्यंत उन्हाळ कांद्याची आवक राहील. - बी. वाय. होळकर, सचिव, लासलगाव बाजार समिती
कांदा आवक आणि दर
कांदा आवक आणि दर

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक कमी अधीक होत असून, दर मात्र गेल्या काही आठवड्यापासून वाढले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या लासलगाव बाजार समितीमध्येही कांद्याला चांगले दर मिळत आहेत. राज्यातील सर्व बाजार समित्यांचा आढावा घेतला असता कांद्याला प्रतिक्विंटल ४०० ते ५२०० रुपये दर मिळाला आहे. 

नागपुरात प्रतिक्विंटल २३०० ते ३३०० रुपये  येथील किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात चांगलीच तेजी आली आहे. लाल कांदा ३५००, तर पांढऱ्या कांद्याचे व्यवहार २५०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. नागपूरच्या कळमणा बाजारात लाल कांदा २३०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलने विकल्या गेला. लाल कांद्याची आवक वाढत असून, २६ नोव्हेंबर रोजी ४६०० क्‍विंटल आवक झाली. पांढरा कांदा १४१९ क्‍विंटलची आवक असून, दर १८०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचे होते. किरकोळ बाजारात मात्र कांदा ५५ ते ६० रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक दराने विकला जात आहे. 

सांगलीत प्रतिक्विंटल १३०० ते ४५०० रुपये विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. बुधवारी (ता. २९) कांद्याची २९९० आवक क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १३०० ते ४५०० तर सरासरी ३५०० रुपये असा दर मिळाला. येथील बाजार समिती कांद्याची आवक सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातून होते. नवीन कांद्याची आवक कर्नाटकातून होते. सध्या कांद्याचा हंगाम आहे; मात्र मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आवकेवर झाला असल्याची माहिती बाजार समितीचे सहायक सचिव व्ही. जे. राजेशिर्के यांनी दिली.

लासलगावला कांदा १००० ते ३३५२ रुपये कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत बुधवारी (ता. २९) २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी लाल कांद्याला १००० ते ३३५२ व सरासरी २६५२ रुपये क्विंटल दर निघाला. मागील आठवड्यात टप्प्याटप्प्याने कांदा दरात ७०० ते ८०० रुपयांपर्यंत उतरण झाली आहे; मात्र यापुढे कांद्याचे सध्याचे दर स्थिर राहतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. देशभरातील वाढती मागणी आणि त्यातुलनेत कमी आवक यामुळे कांद्याच्या दरात यापुढे अधिक उतरण होण्याची शक्‍यता नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

औरंगाबादेत प्रतिक्विंटल ४०० ते ३१०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २९) कांद्याची ७२७ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला ४०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सदस्यांनी दिली. गत तीन ते चार आठवड्यांतील ही सर्वाधिक आवक असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीमध्ये आवक व दरातील चढउतार सातत्याने कायम आहे. 

जळगावात प्रतिक्विंटल २००० ते ३३२५ रुपये  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २९) कांद्याची २७० क्विंटल आवक झाली. त्याला दोन हजार ते ३३२५ रुपये आणि सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक धुळे जिल्ह्यातूनही होत असून, हवी तेवढी आवक नसल्याने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर मिळत आहेत. मागील आठवड्यात आवक ३०० क्विंटलेक्षा अधिक होती. या आठवड्यात आवक काहीशी घटली आहे. मागील सोमवारपासून (ता. २७) कांद्याचे दर स्थिर असून, सकाळी आवक होताच लागलीच लिलावही होत आहेत. आवक धुळ्यासह पारोळा, पाचोरा, यावल, चोपडा आदी भागांतून होत आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल १६०० ते ३२०० रुपये गेल्या काही दिवसांपासून येथील बाजारात कांद्याचे दर वधारलेले असून, कमीत कमी १६०० ते जास्तीत जास्त ३२०० पर्यंत भाव मिळत आहे. कांद्याची खानदेश, नगरमधून दररोज चार ते पाच गाड्यांची आवक होत आहे. येत्या आठवड्यात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर भावांमध्ये घसरण होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये तेजी आलेली आहे. जुना व कोरडा कांदा ३२०० पर्यंत विकला जात आहे. 

परभणीत प्रतिक्विंटल ३००० ते ५२०० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ५२०० रुपये असल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस कांद्याची आवक होत असते. गेल्या महिनाभरात प्रत्येक शनिवारी ६०० ते १००० क्विंटल कांद्याची आवक झाली, तर प्रत्येक मंगळवारी २०० ते ६०० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते ५२०० रुपये दर मिळाले, असे व्यापारी मो. शेख नासेर यांनी सांगितले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल १५०० ते ५००० रुपये येथील बाजार समितीत कांद्यास १५०० ते ५००० रुपये इतका दर मिळाला. कांद्याची दररोज नऊ ते दहा हजार क्विंटल इतकी आवक झाली. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येथील बाजार समितीत कांद्याच्या आवकेत अनियमिता आहे. गेल्या महिन्यात कांद्याचे दर चांगलेच वाढले होते; पण गेल्या पंधरवड्यात कांद्याचे दर स्थिर राहू शकले नाहीत. येत्या पंधरा दिवसांत तरी सध्या असलेले दरच अपवाद वगळता कायम राहतील, अशी शक्‍यता कांदा बाजार विभागातून व्यक्त करण्यात आली. नगर भागातून सध्या कांद्याची आवक होत आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटल २००० ते ५२०० रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक वाढली, तरीही कांद्याला मागणी वाढल्याने दरातील तेजी कायम राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ५२०० रुपयांवर दर पोचल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक या सप्ताहात वाढली; पण मागणी चांगली असल्याने दरातील तेजी कायम राहिली. गेल्या आठवड्यात कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली. साताऱ्यात प्रतिक्विंटल ४५०० ते ५२०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांद्याची ३८६ क्विंटल आवक झाली. कांद्यास दहा किलोस ४५० ते ५२० असा दर मिळाला आहे. मागील सप्ताहापासून कांद्याचे दर तेजीत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. खटाव, माण, फलटण, खंडाळा तालुक्‍यातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याची ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.  बाजार समित्यांमधील बुधवारी (ता. २९) झालेली कांदा आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

बाजार समिती  आवक     किमान     कमाल
नागपूर     १३१०     २३००     ३३००
अकोला     ५००     १६००     २८००
औरंगाबाद     ७२७     ४००     ३१००
लासलगाव     २०,०००     १०००     ३३५२
सोलापूर     ४२६१     २०००     ५०००
कोल्हापूर     ९१६९     १५००     ५३००
पुणे     १५,०२९     १५००     ४३००
मुंबई     १७,५००     ३०००     ४२०००
सांगली     २९९     १३००     ४५०० 
जळगाव     २७०     २०००     ३३२५ 

    आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील दराची तुलनात्मक  स्थिती (प्रतिक्विंटलचे सरासरी दर)

  २०१६     २०१६     २०१७ २०१७
बाजार समिती   नोव्हेंबर  आॅक्टोबर     नोव्हेंबर    आॅक्टोबर
औरंगाबाद     ५००     ४३०     २३९९     १७७५
कोल्हापूर     ७६४     ६१३     २९०९     २२८५
मुंबई     ७६६     ६७२     ३२२८     २४९९
नागपूर     ११००     ६८६     ३०८२     २११६
नाशिक     ८०३     ५६१     २८००     २१४१
पुणे     १०१३     ७३६     २९४२     २१८८
जळगाव     ६२५     ५१०     २१४९     १५४५

स्त्रोत ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे, ॲगमार्कनेट. प्रतिक्रिया मागील सप्ताहात कांद्याच्या दरात क्विंटलमागे १००० रुपयांपर्यंत उतरण झाली आहे. सरकारने ८५० डॉलर "एमईपी'' लादल्यामुळे निर्यातीला अटकाव आला. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. - भाऊसाहेब गोसावी, शेतकरी, निमोणा, जि. नाशिक

कांद्याचे दर वाढल्याने उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ थोडा बसेल, असे वाटते; पण बाजारात सर्वच शेतकऱ्यांना कमाल दर मिळतो, असे नाही. किमान दर आणखी वाढायला हवे आहेत. - अनिल चौधरी, शेतकरी, खेडी खुर्द, ता. जळगाव

आवक कमी अधिक होत आहे. दरही टिकून आहेत. जळगावात आता थेट धुळ्यामधूनही कांदा येऊ लागला आहे. आवकेची स्थिती लक्षात घेता दर स्थिर राहतील, असे वाटते. - हिरामण माळी, व्यापारी, जळगाव बाजार समिती

नवीन कांद्यांची येत्या आठवड्यात आवक वाढू शकते. हा कांदा अधिक प्रमाणात विक्रीला येताच दरांमध्ये कमी होण्याची शक्‍यता आहे. - अयुब सेठ, कांदा व्यापारी, अकोला

गेल्या वर्षीपेक्षा भाव चांगले आहेत. येत्या आठवड्यात कांदा काढणीला येत आहे. सध्या तीन ते चार हजार रुपये दराने विक्री होत आहे. कांदा निघेपर्यंत हे दर टिकतात काय हे बघावे लागेल. - किसन दांदळे, कांदा उत्पादक, देऊळगाव जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com