कांदा बाजारात दरवाढीचे संकेत

कांदा बाजारात दरवाढीचे संकेत
कांदा बाजारात दरवाढीचे संकेत

नाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या पाऱ्यामुळे तेथे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चांगल्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यात इतर देशांत निर्यातही चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे कांद्याच्या दरात येत्या काळात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) १६७७५ क्विंटल आवक होऊन व्यापारी वर्गाने ५०० रुपयांपासून ते ११९१ रुपयांपर्यंत बाजारभावाने कांदा खरेदी केला. काल कांद्याला सरासरी १०८० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. येथील बाजार समितीत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याच्या दरात दररोज ५० ते १०० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी आपला बहुतांशी उन्हाळ कांदा हा ६५० रुपयांनी विक्री केला होता. साधारणपणे २० मेपर्यंत हेच भाव टिकून होते त्यानंतर सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत पोचले होते. मे महिन्याच्या अखेरीस कांदा ८०० रुपयांपर्यंत पोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्या भावाबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या. आपला कांदा हजारी पार करेल या अपेक्षेने शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी बाजार आवारावर आणत होते. गेल्या तीन महिन्यात कांद्याच्या बाजारभावाची पातळी ३०० रुपयांनी वाढून आता कांदा सरासरी १०८० रुपयांनी विक्री होत आहे. कांद्याच्या दरात तेजी निर्माण झाली की केंद्र सरकार तातडीने हालचाल करून वाढलेले भाव पाडण्याचे प्रयत्न करीत असते. गेली तीन-चार महिने आपल्या शेतातील चाळीत साठवलेला कांदा आज विक्रीस आणला जात असल्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळावे ही रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कांदा दर वाढले, तरी शासनाने हस्तक्षेप करू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज १८ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. बरेच दिवस ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल विकला जाणारा कांदा एक हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे. राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये साठवणूक झालेल्या कांद्याला तेथील कडक उन्हाचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे. त्यामुळेच त्या दोन राज्यांतून व इतर काही राज्यांतून नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळत असून कोलंबो, दुबई व बांगलादेश या तीन देशांसह अन्य छोट्या देशांमध्ये कांद्याची मागणी चांगल्या प्रमाणात वाढल्याची माहिती मिळत असल्याने कांदा बाजारभावात सुधारणा होत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट भाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या मध्यंतरी कांदा १००० रुपयांपर्यंत पोचला आहे. मागील वर्षी जून महिन्यात कांद्याचे सरासरी दर ५५० रुपये इतके होते त्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र या वर्षी उन्हाळ कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कांदा दुप्पट बाजारभावाने विकला जात आहे.

उत्कृष्ट कांद्याला चांगला भाव सध्या बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा चाळीत साठवलेला असून, सध्या भाव वाढलेले असले तरी चांगल्या मालाला चांगला भाव मिळणार आहे, अशी परिस्थिती असल्याचे जाणकारांनी सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातही साठवणुकीतील कांद्याचे नुकसान होत आहे. देशभरातून होणाऱ्या मागणीतही वाढ होत आहे. या स्थितीत येत्या काळात कांद्याच्या दरात अजून काही प्रमाणात वाढ होईल.  - सोहनलाल भंडारी, अध्यक्ष- नाशिक जिल्हा कांदा बटाटा व्यापारी असोसिएशन, पिंपळगाव बसवंत, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com