राज्यात ऑनलाइन सातबारा वितरण ठप्प

राज्यात ऑनलाइन सातबारा वितरण ठप्प
राज्यात ऑनलाइन सातबारा वितरण ठप्प

पुणे : ऑनलाइन साताबारा वितरण प्रकल्पासाठी काम करणारे सर्व्हर बिघडल्यामुळे राज्याच्या २८ जिल्ह्यांमधील सातबारा वितरण मंगळवारपासून ठप्प झाले आहे. यामुळे एेन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढला. बुधवारी दिवसभर सर्व्हर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, सातारा आणि ठाणे तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग वगळता राज्यभर डिजिटल सातबारा वितरण ठप्प झाले आहे. महसूल खाते तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  राज्यात बहुतेक सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या सातबारांमधील दुरुस्तीची कामे पूर्ण करून संगणकीय सातबारा तयार केले गेले आहेत. शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन सातबारा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला. मात्र, हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे.  तलाठी वर्गाचा या प्रचंड विरोध आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असतानाही शासनाने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. "डिजिटल सातबारा वितरणात कितीही अडचणी आल्या तरी राज्य शासन आता मूळ हेतूपासून बाजूला जाणार नाही. सर्व्हरमधील बिघाड तात्पुरत्या स्वरूपाचा असून, त्याचा बाऊ करून पुन्हा हस्तलिखित सातबारा देण्याची भ्रष्ट पद्धत लागू केली जाणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.  डिजिटल सातबारा वितरणासाठी बीएसएनएलच्या क्लाऊडचा पाच जिल्ह्यांमध्ये वापर केला जात असून, तेथे समस्या आलेली नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये लोकल सर्व्हर काम चालू आहे. मात्र, स्टेट डाटा सेंटरकडून २८ जिल्ह्यांमध्ये वापरल्या जात असलेल्या प्रणालीवर काम करणारे सर्व्हर बंद पडल्यामुळे समस्या उद्भवली, अशी माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारपासून राज्यभर सातबारा वितरण सुरळीत होण्याची शक्यता आहे. भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही यासाठीदेखील दीर्घकालीन उपाय करण्याच्या सूचना मंत्रालयातून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com