कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुर

पाऊस झाला नाही. औत रानात नेली नाहीत. पेरणी केलीच नाही. कसला पीकविमा अन्‌ कसलं काय सगळं गौडबंगाल. पीकविम्याबाबात केवळ शासन दरबारी चर्चा सुरू आहेत. - बाळासाहेब माने, ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ
ढालगाव, ता. कवठेमहांकाळ ः पावसाने पाठ फिरवल्याने शेतात पिकांऐवजी मातीची ढेकळंच दिसत आहेत.
ढालगाव, ता. कवठेमहांकाळ ः पावसाने पाठ फिरवल्याने शेतात पिकांऐवजी मातीची ढेकळंच दिसत आहेत.

झळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर पेरलय. परत पावसाची वाट बघितली पण पाऊसच नाही. कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुर अन्‌ सोसाट्याचा वारा. पण ह्यो पाऊस काय फायद्याचा. असं गेली तीन वरिस होतय. पाऊस नसल्यानं पेरायला रान तयार केल्याती पण आमच्या नशिबी खरीप नाय, अशी खंत आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

आटपाडी, तासगाव तालुक्‍याचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी पहिल्या पावसावर बाजरी, मका, उडिद, मूग या पिकांची पेरणी केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तर काही भागात पिके वाळू लागली आहेत. तर मका पिकांची वाढ खुंटली आहे. उत्पादनच हाती येण्याची शक्यता नसल्याचे शेतकरी हताशपणे सांगत होते. कसंबसं जनावरांचा चारा मिळेल पण हा चारा महिन्यातच संपेल. मग पुढं काय करायचं? असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

या भागातील काही शेतकऱ्यांनी मोठा पाऊस झाल्यावर पेरणी करायची म्हणून आजही पेरणीसाठी रानं तयार करून ठेवली आहेत. मात्र, चांगला पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात औतसुद्धा घातला नसल्याचे चित्र आहे. दुष्काळी पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी करणे धोक्‍याचे बनले आहे. पाऊसच झाला नाही तर पिकं कशी येणार, त्यातून उत्पादन कसे मिळणार, अन्‌ प्रपंच कसा चालवायचा, असे प्रश्‍न शेतकरी मांडत आहेत.

शासनाने पीकविमा दिलाय. पण. या पीकविम्याचा लाभ वर्षानंतर मिळतोय. मुळात पिकविमा मिळाला की सगळेच प्रश्‍न सुटतात असे नाही. केवळ आर्थिक हातभार लागतोय. पण शेतात जर काहीच पिकलं नाही तर धान्य विकतच घ्यावे लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आटपाडी तालुक्‍यातील झरे गावात सुमारे सात वर्षांपासून अपेक्षित पाऊसच झाला नाही. यामुळे या भागातील खरीप हंगाम गेल्या सात वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातीच येत नाही. अशीच परिस्‍थिती तालुक्‍यातील सर्वच गावांत पाहायला मिळते आहे. चारा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐन पावसाळ्यात इथल्या ग्रामस्थांना भेडसावू लागला आहे.

उन्हाळा मोडलाच नाही कवठेमहंकाळ तालुक्‍यातील ढालगाव हे मंडळ आहे. या मंडळात सुमारे १४ गावे येतात. परिसरात पाऊसच झाला नाही. यामुळे बघलं तिकडं रान शिवार सुनं पडलं होतं. शेतात पिकांच्या ऐवजी मातीची ढेकळचं दिसत होती. दोन वर्षांपासून ओढे, नाले, तलाव हे पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरणारी माण नदी आजही कोरडी आहे. 

प्रतिक्रिया पहिल्या पावसावर बाजरी पेरली आहे. पण पाऊस नाही त्यामुळे बाजरी उगवलीच नाही. आता रब्बीवर आशा अवलंबून आहे. - बिरा कृष्णा लेंगरे, लेंगरेवाडी, ता. आटपाडी. पाऊस नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव कोरडे पडले आहेत. सलग तीन वर्षे खरीप हंगाम वाया गेलाय. शासन याकडे लक्ष देत नाही. गेल्यावर्षीचा पीकविमा मिळाला. पण, अनेक शेतकरी पीकविम्यापासूनच वंचित आहेत. - भगवान आनांसो फोंडे, दुधेभावी, ता कवठेमंहाकाळ महिना झालाय पावसाने दडी मारली. नुसतं ढग येत्याती. पिकं माना टाकू लागल्याती. दावणीला चार पाच जित्राबं हायती. पाणी न्हाय. टॅंकरनं पाणी घेतल्याशिवाय पर्याय नाय. - दिलीप पाटील, हळ्ळी, ता. जत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com